खराब फॉर्ममध्ये असलेल्या जड्डूला धोनीकडून मिळाला ‘हा’ गुरुमंत्र, मग चोप चोपल्या धावा
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा सध्याच्या भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. रवींद्र जडेजाने मागील काही वर्षांपासून आपल्या खेळात सुधारणा केल्या आहेत. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याचे भारतीय संघातील जवळपास स्थान पक्के झाले आहे. तो वेगाने क्षेत्ररक्षण करतो, संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करतो आणि तितकीच दमदार गोलंदाजीही करतो.
परंतु एकेकाळी याच जडेजाचा फलंदाजी फॉर्म खूप खराब स्थितीत होता. त्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांने त्याला मोलाचा सल्ला दिला होता. त्यामुळे जडेजाच्या फलंदाजीला एक वेगळे वळण मिळाले होते. जडेजाने काही दिवसापूर्वी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत उलगडा केला आहे.
जडेजाने सांगितले की, “2015 विश्वचषक सामन्यादरम्यान कोणता शॉट मारायचा याची निवड करणे देखील मला अवघड वाटायचे. त्याचा परिणाम माझा खेळावर होत होता. त्यावेळी धोनीने माझी मदत केली होती. त्याने मला सांगितले होते की, मी अशा चेंडूंवर शॉट खेळायचा प्रयत्न करत होतो, ज्यावर वास्तवात मला शॉट मारण्याची गरज नव्हती. मलासुद्धा असे वाटत होते की, मी शॉट मारण्यासाठी चुकीच्या चेंडूची निवड करत आहे. कारण माझ्या डोक्यात नेहमी हाच प्रश्न असायचा की, मी शॉट मारू की नको?.”
जडेजाने पुढे सांगितले की, “धोनीच्या सल्ल्यानंतर मी याच्यावर खूप कष्ट घेतले. माझ्या डोक्यात ही गोष्ट स्पष्ट होती की, मला टिकून खेळायचे आहे. तेव्हाच मी जास्त धावा करू शकतो. जर शॉर्ट चेंडूवर षटकार मारला तर खेळायची हिम्मत मिळते. ज्यामुळे फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन होते.”
सध्या रवींद्र जडेजा मागील दोन आठवड्यांपासून भारतीय संघासोबत मुंबई येथील हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. भारतीय संघ 2 जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जवळ जवळ तीन महिने भारतीय संघ इंग्लंडमध्ये राहणार असून भारतीय संघाचा 18 जून ते 22 जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तू कसोटीसाठी सज्ज आहेस; पुजाराच्या शब्दांनी भारावला होता ‘हा’ ३२७ बळी घेणारा गोलंदाज
तब्बल १८ शतके करणाऱ्या ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला करायची आहे द्रविड अन् लक्ष्मणसोबत फलंदाजी