भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 338 धावांवर रोखल्यानंतर भारताचा पहिला डावही केवळ 244 धावांवरच आटोपला. भारताकडून शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी साकारली. याचसोबत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारतीय अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने उत्तम गोलंदाजी करत 4 बळी मिळवले होते. त्याचप्रमाणे जडेजाने क्षेत्ररक्षणातही आपली निपुणता दाखवत स्टीव स्मिथला एका अचूक थ्रोवर रन आऊट देखील केले होते.
परंतु पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मिचेल स्टार्कच्या एका चेंडूवर जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली असल्याने तो दुसऱ्या डावात खेळण्यासाठी उपलब्ध असणार नाही. जडेजाची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाबद्दल बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला, “जेव्हा तुम्ही रवींद्र जडेजा सारख्या गोलंदाजाला गमावतात तेव्हा ते संघासाठी फारच दुःखद असते. त्याने पहिल्या डावात 4 बळी घेतले होते. जडेजा एका बाजूने नियमितपणे उत्तम गोलंदाजी करू शकतो. जडेजा गोलंदाजी सोबतच क्षेत्ररक्षणातही उत्तम कामगिरी करतो. त्याचे मैदानात नसणे हे संघासाठी मोठा झटका आहे.”
दरम्यान सामन्याचा विचार केला असता तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमावत 103 धावापर्यंत मजल मारली होती. लबुशाने 47 तर स्टीव स्मिथ 29 धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाची सामन्यातील आघाडी 197 धावांची झाली असून सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल.
महत्वाच्या बातम्या:
भंडारा दुर्घटनेबद्दल ऐकून शोएब अख्तरच्याही डोळ्यात आलं पाणी, ट्विटवर व्यक्त केल्या भावना; म्हणाला
हे तर आठवे आश्चर्य! चक्क मांजरेकरांनी केले जडेजाचे कौतुक, म्हणाले
पुजारा विरुद्ध या रणनीतीने गोलंदाजी केल्याने मिळाले यश, पॅट कमिन्सने केला खुलासा