भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, यात काहीच शंका नाही. तसेच तो एक उत्कृष्ट कर्णधार देखील आहे. त्याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठ मोठ्या मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. परंतु त्याला अजूनपर्यंत आयसीसीची ट्रॉफी जिंकून देण्यात यश आले नाही. ज्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जाते. अशातच भारतीय संघातील खेळाडूने कर्णधारावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवार पासून (१२ ऑगस्ट) लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात उतरण्यापूर्वी भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रवींद्र जडेजा आणि विराट कोहली हे २००८ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेपासूनच एकत्र खेळत आहेत. त्यावेळी देखील विराट कोहली संघाचा कर्णधार होता.
रवींद्र जडेजाने म्हटले की, “हो, मी त्याच्यासोबत १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेपासून खेळत आहे. तो आता खूप परिपक्व झाला आहे. तसेच तो नेहमीच सकारात्मक असतो.आम्ही कुठल्याही संघाविरुद्ध खेळत असो, त्याला नेहमीच जिंकायचे असते. एक सामान्य सामना असो किंवा मोठी मालिका, त्याला नेहमीच सामना जिंकून आपला दबदबा निर्माण करायचा असतो. त्याच्या नेतृत्वाची सकारात्मक बाब म्हणजे, तो नेहमी संघात चांगले वातावरण निर्माण करत असतो. तसेच तो मैदानात असताना नेहमीच आक्रमक असतो.”(Ravindra Jadeja says Virat Kohli become more matured captain and very positive)
आयपीएल स्पर्धेसाठी सज्ज
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबाबत बोलताना जडेजा म्हणाला, “होय, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा सुरू होणार आहे. ही स्पर्धा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आम्ही आयपीएल आणि विश्वचषक स्पर्धा एक सारख्याच खेळपट्टीवर खेळणार आहोत. ज्याचा फायदा आम्हाला टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी होईल.”