भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहे. खेळाच्या तिनही प्रकारात त्याने आपली वेगळीच छाप सोडली आहे. जडेजाने २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी सामन्यात तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले होते आणि त्याने त्याचे खास सेलिब्रेशन केले होते.
या घटनेला दोन वर्षे पालटल्यानंतर त्याने या सेलिब्रेशनबद्दल मोठा खुलासा केला आहे. ते सेलिब्रेशन माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांच्यासाठी असल्याचे त्याने सांगितले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक २०१९ स्पर्धेचा उपांत्य फेरी सामना रंगला होता. या सामन्यात जडेजाने उल्लेखनीय कामगिरी करत अर्धशतक झळकावले होते. त्याने ७७ धावांची खेळी केली होती. संघातील वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर जडेजाने एकहाती झुंज दिली होती. परंतु भारतीय संघाला विजय मिळवण्यात अपयश आले होते. त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहून गेले होते.
या सामन्यात जडेजाने फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने १० षटक गोलंदाजी करताना अवघ्या ३४ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता. या सामन्यात भारतीय संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु जडेजाने केलेल्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक केले गेले होते.
मात्र या सामन्यापूर्वी समालोचक संजय मांजरेकर यांनी जडेजाबद्दल मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी जडेजावर टीका करत म्हटले होते की, “जडेजा थोडी फलंदाजी करतो आणि थोडी गोलंदाजी करतो.” अर्थातच त्यांनी जडेजाच्या प्रदर्शनावर शंका व्यक्त केली होती.
मांजरेकर यांच्या या वक्तव्यानंतर त्यावेळी जडेजाने ट्विट करत म्हटले होते की, “मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळतच आहे. त्यामुळे ज्याने जे काही मिळवले आहे, त्याचा आदर करा आणि आपली फालतू बडबड बंद करा.”
आता याच सामन्यातील अर्धशतकानंतरच्या आपल्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनविषयी जडेजाने उलगडा केला आहे. जडेजाने इंडियन्स एक्सप्रेससोबत बोलताना म्हटले की, “तेव्हा भट्टी तापलेली होती. म्हणजेच मैदानातील वातावरणच असे होते की, मी कॉमेंट्री बॉक्स शोधत होतो. थोडक्यात ते सेलिब्रेशन अजून कोणासाठी नव्हे तर माझ्यावर टीका करणाऱ्या मांजरेकरांसाठी होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
मी चुकून झेल सोडला तरीही लोक म्हणतात, ‘होतं असं कधी-कधी’; जड्डूने व्यक्त केला आनंद
चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदा इंग्लंडला कसोटीत धूळ चारणारा भारतीय धुरंधर, नाव आहे ‘पंकज रॉय’