रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (22 मे) आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. तत्पूर्वी, एक मोठी बातमी समोर आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं सामन्यापूर्वीचं त्यांचं एकमेव सराव सत्र रद्द केलं. नॉकआऊट सामन्याच्या तयारीसाठी आरसीबीची टीम मंगळवारी अहमदाबादमधील गुजरात कॉलेज मैदानावर सराव करणार होती. परंतु संघानं कोणतंही अधिकृत कारण न देता सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, त्याच ठिकाणी राजस्थान रॉयल्सचं नियमित सराव सत्र झालं. मात्र कोणतीही पत्रकार परिषद झाली नाही, जे की सहसा घडत नाही.
रिपोर्ट्सनुसार, आरसीबीनं त्यांचं सराव सत्र रद्द करण्यामागील प्राथमिक कारण हे विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याचं म्हटलं जात आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री अहमदाबाद विमानतळावरून चार जणांना अटक केली. पोलिसांनी चार आरोपींची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून शस्त्रे, संशयास्पद व्हिडिओ आणि मजकूर संदेश जप्त केल्याची माहिती आहे.
ही माहिती राजस्थान आणि बंगळुरूच्या संघाला शेअर करण्यात आली. यानंतर आरसीबीनं सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितलं की, सराव सत्र होणार नाही. सराव सत्र रद्द करण्याच्या या अचानक निर्णयामागे आरसीबीनं कोणतंही अधिकृत कारण दिलेलं नाही.
आरसीबी आणि राजस्थानचे संघ सोमवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले. आरसीबीच्या टीम हॉटेलबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. सर्व टीम सदस्यांसाठी एक वेगळी एंट्री होती, ज्याद्वारे हॉटेलमधील इतर कोणत्याही पाहुण्यांना प्रवेश नव्हता. याशिवाय आयपीएल कव्हर करणाऱ्या पत्रकारांनाही हॉटेलच्या आवारात प्रवेश दिला जात नव्हता.
दुसरीकडे, राजस्थानची टीम ‘ग्रीन कॉरिडॉर’ वापरून मैदानावर आली होती. तीन पोलिसांच्या ताफ्यानं टीम बसला एस्कॉर्ट केलं. कॅप्टन संजू सॅमसन उशिरा पोहोचला. रविचंद्रन अश्विन, रियान पराग आणि युझवेंद्र चहल यांनी सराव सत्र सोडून हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षणाला उपस्थित असलेल्या राजस्थानच्या खेळाडूंना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं होतं. संपूर्ण मैदानावर पोलिसांची गस्त होती.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादच्या एकतर्फी पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सची प्रतिक्रिया, म्हणाला, “आम्ही या पराभवाला…”
केकेआरची फायनलमध्ये धडक, पॅट कमिन्सच्या संघाचा दारुण पराभव
केकेआरचे 24.75 कोटी रुपये वसूल! मिचेल स्टार्कनं प्लेऑफमध्ये दाखवला त्याचा वर्ल्डकपमधील फॉर्म