दुबई। इंडियन प्रीमीयर लीगच्या इतिहासात शुक्रवारी (८ ऑक्टोबर) पहिल्यांदाच असं घडले की दोन सामने एकाच वेळी सुरु झाले. शुक्रावारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात ५५ वा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ५६ वा सामना एकाचवेळी सुरु झाला. बेंगलोर विरुद्ध दिल्ली यांच्या पार पडलेल्या रोमांचक सामन्यात बेंगलोर संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या आणि बेंगलोरला १६५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरने अखेरच्या चेंडूवर पूर्ण करत सामना जिंकला. बेंगलोरने २० षटकांत ३ बाद १६६ धावा केल्या.
बेंगलोरकडून १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण या दोघांना खास काही करता आले नाही. एन्रीच नॉर्किएने दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पडीक्कल पहिल्या षटकात पहिलाच चेंडू खेळताना बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. तर, विराट ४ धावांवर तिसऱ्या षटकात बाद झाला.
त्यानंतर श्रीकर भारतने एबी डिविलियर्ससह डाव सांभाळला. ही जोडी मैदानावर स्थिरावली असतानाच डिविलियर्स २६ धावांवर १० व्या षटकात अक्षर पटेलच्या विरुद्ध फटका मारताना श्रेयस अय्यरकडे झेल देऊन बाद झाला. पण त्यानंतर, ग्लेन मॅक्सवेलने भारतची दमदार साथ दिली. भारत आणि मॅक्सवेल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. या दोघांनी शतकी भागादारी करत बेंगलोरला विजयाच्या दिशेने नेले.
अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बेंगलोरला ६ धावांची गरज होती. पण हे षटक टाकत असलेल्या अवेश खानने वाईड चेंडू टाकला. त्यामुळे बेंगलोरसाठी विजयाचे समीकरण १ चेंडू ५ धावा असे झाले. असे असतानाच श्रीकर भारतने खणखणीत षटकार ठोकला आणि बेंगलोरच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रीकर भारत ५२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला. तर मॅक्सवेलने ३३ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या.
शिखर-शॉची दमदार सलामी
बेंगलोर विरुद्ध दिल्ली सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. या दोघांनीही दिल्लीला दमदार सुरुवात करुन दिली. पण, दोघांचेही अर्धशतकं थोडक्यात हुकली. या दोघांनी ८८ धावांची सलामी दिली. त्यांची जोडी शिखर ४३ धावांवर ११ व्या षटकात हर्षल पटेल विरुद्ध खेळताना बाद झाल्याने तुटली.
त्याच्यापाठोपाठ शॉ देखील ४८ धावांवर १२ व्या षटकात युजवेंद्र चहलने टाकलेला चेंडू खेळताना जॉर्ज गार्टनकडे झेल देऊन बाद झाला. पुढच्यात षटकात रिषभ पंतला डॅनियल ख्रिश्चनने १० धावांवर बाद केले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सांभाळला होता. पण श्रेयसला १८ धावांवर १८ व्या षटकात मोहम्मद सिराजने बाद केले.
त्यापाठोपाठ डावाच्या अखेरच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायर २९ धावांवर सिराजविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यामुळे दिल्लीला ५ बाद १६४ धावा करता आल्या. रिपल पटेल ७ धावांवर नाबाद राहिला.
असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ –
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), रिपल पटेल, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एन्रिच नॉर्किए
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), डॅनियल ख्रिश्चन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, जॉर्ज गार्टन, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल