मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने १० विकेट्सने मोठा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १७७ धावा केल्या आणि बेंगलोरला १७८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बेंगलोरने एकही विकेट न गमावता १७ व्या षटकात सहज पार केले.
राजस्थानने दिलेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बेंगलोरकडून विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल उतरले होते. या दोघांनीही सुरुवातीपासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर वर्चस्व ठेवून खेळ केला. दरम्यान देवदत्तने ५१ चेंडूत त्याचे पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. तर विराटने ३४ चेंडूत त्याचे ४० वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी शेवटपर्यंत आपली विकेट जाऊ न देतान बेंगलोरला १६.३ षटकात १० विकेट्सने विजय मिळवून दिला.
विराट ४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७२ धावांवर नाबाद राहिला. तर देवदत्त ५२ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांसह १०१ धावांवर नाबाद राहिला.
विराटने या खेळीदरम्यान आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पाही पार केला. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
https://twitter.com/IPL/status/1385280061461327877
शिवम दुबे आणि राहुल तेवतियाची फटकेबाजी
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानकडून जोस बटलर आणि मनन वोहरा सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. पण त्यांना संघाला चांगली सुरुवात देण्यात अपयश आले. बटलरला तिसऱ्या षटकात ८ धावांवर मोहम्मद सिराजने त्रिफळाचीत केले.
त्यापुढच्याच षटकात काईल जेमीसनने वोहराला केन रिचर्डसनकरवी ७ धावांवर असताना झेलबाद केले. ५ व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलर शुन्यावर पायचीत झाला. यानंतर कर्णधार संजू सॅमसनने शिवम दुबेसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ८ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने ग्लेन मॅक्सवेलकरवी सॅमसनला २१ धावांवर झेलबाद केले. त्यामुळे एका क्षणी राजस्थानची आवस्था ४३ धावांवर ४ बाद अशी झाली होती.
मात्र, त्यानंतर शिवम दुबेने रियान परागला साथीला घेत राजस्थानचा डाव सावरला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत राजस्थानला १३ षटकांपर्यंत १०० धावांच्या पार नेले.
मात्र, १४ व्या षटकात रियान पराग २५ धावांवर हर्षल पटेलच्या तर १६ व्या षटकात शिवम दुबे ३२ चेंडूत ४६ धावा करुन केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण असे असताना राहुल तेवतियाने आक्रमक खेळी करत २३ चेंडूत ४० धावांची खेळी केली. मात्र तोही १९ व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेरच्या षटकात ख्रिस मॉरीसने १० धावांवर आणि चेतन सकारिया शुन्यावर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाले. अखेर राजस्थानला २० षटकात ९ बाद १७७ धावा करता आल्या.
बेंगलोरकडून मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर काईल जेमीसन, केन रिचर्डसन आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
https://twitter.com/IPL/status/1385262212009250821
बेंगलोरचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी बेंगलोरने अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला असून त्यांनी रजत पाटिदारऐवजी केन रिचर्डसनला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली. तसेच राजस्थानने त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला. त्यांनी जयदेव उनाडकट ऐवजी श्रेयस गोपाळला अंतिम ११ जणांच्या संघामध्ये संधी दिली.
https://twitter.com/IPL/status/1385226909353615364
असे आहेत ११ जणांचे संघ –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पद्धिकल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रहमान.






