इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL)19 व्या हंगामात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. आरसीबीने खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. संघाच्या या यशात अनुभवी फिरकीपटू क्रुणाल पांड्याने (Krunal pandya) चेंडूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, विशेषतः मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात क्रुणालने 4 षटकांत केवळ 26 धावा देऊन 1 विकेट्स घेतली. फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर मुंबईला 241 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते, परंतु क्रुणालच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे आरसीबीने हा सामना 18 धावांनी जिंकला.
क्रुणाल पांड्या सध्या त्याच्या फिरकी गोलंदाजीमध्ये अचानक ‘बाऊन्सर’ टाकून फलंदाजांना चकित करत आहे. याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे. क्रुणालच्या मते, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमामुळे आता फलंदाजी खूप खोलवर (क्रमांक 8 पर्यंत) आली आहे. मुकुल चौधरी आणि वैभव सूर्यवंशी यांसारखे तरुण खेळाडू पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारत आहेत. अशा वेळी गोलंदाजाला फलंदाजाच्या एक पाऊल पुढे राहणे गरजेचे आहे. मी माझ्या करिअरमध्ये नवीन गोष्टी करून पाहण्यास कधीही मागे-पुढे पाहिले नाही, असे क्रुणालने सांगितले. बाऊन्सरबद्दल बोलताना तो म्हणाला, मी आधीच ठरवून बाऊन्सर टाकत नाही की हा चेंडू चौथा असेल की सहावा. प्रसंगी मी सलग दोन बाऊन्सरही टाकू शकतो. लोक माझ्या वेगळ्या वाटणाऱ्या चेंडूंची चर्चा करतात, पण मी नेहमी माझ्या गोलंदाजीच्या मूलभूत गोष्टींवर (Basics) लक्ष केंद्रित करतो. आरसीबीचा या मोसमातील पुढचा सामना 15 एप्रिल रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे.





