मुंबई। अनऍकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमधील दुसऱ्या सामन्यातही रंगतदार खेळ झाला. नेथन रिअर्डन याच्या शतकानंतरही रविवारी श्रीलंका लिजंड्सने ऑस्ट्रेलिया लिजंड्सला सात धावांनी पराभूत केले.
या पंचरंगी ट्वेंटी20 स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर प्रकाशझोतातील दुसरा चुरशीचा रंगतदार झाला. श्रीलंकेने 162 धावांचे आव्हान दिले असताना ऑस्ट्रेलियाचा डाव एक चेंडू बाकी असताना 154 धावांवर संपला. रिअर्डन याने 96 धावांच्या खेळीसह केलेले प्रयत्न थोडक्यात अपुरे पडले.
श्रीलंकेच्या डावात दमदार सलामीवीर रोमेश कालुवितरणा याने टोलेबाजी केली. चमारा कपुगेदारा आणि फरवीझ महारुफ यांनीही आक्रमक फलंदाजी केली. त्यानंतर रिअर्डन याच्या प्रतिआक्रमणामुले वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेटप्रेमींना चुरशीच्या खेळाचा थरार अनुभवता आला.
श्रीलंका लिजंड्सचा कर्णधार तिलकरत्ने दिल्शान याने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली. लंकेच्या डावात सर्वांचे लक्ष रोमेश कालुवितरणा याच्यावर होते, पण त्याला स्ट्राईक लवकर मिळाली नाही. दिल्शानने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर क्लिंट मॅके, तर दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर झेव्हीयर डोहर्टीला चौकार मारला.
तोपर्यंत कालुवितरणाने एका चेंडूत एकेरी धाव घेऊन खाते उघडले होते. तिसऱ्या षटकात कालुवितरणा फलंदाजीला आला. त्याने मॅकेला सलग तीन चौकार मारले.
दिल्शान मग डोहर्टीला सलग दोन चौकार मारून पायचीत झाला. लंकेच्या डावात चमारा कपुगेदारा याने मार्क कॉसग्रोव्हला सलग तीन चौकार मारले. कालुवितरणाची वेगवान खेळी कॉसग्रोवने संपविली.
अंतिम टप्यात फरवीझ महारुफने उपयुक्त भर घातली. अखेरच्या षटकात त्याने जेसन क्रेझाचा पाचवा चेंडू सीमापार केला, तर अखेरच्या चेंडूवर षटकार मारला.
ऑस्ट्रेलियाची सुरवात धक्कादायक झाली. पहिल्या षटकात चमिंडा वासने क्लिंगरला (0) बाद केले. दिल्शानने मग नवा चेंडू हातात घेत पहिल्याच चेंडूवर मार्क कॉसग्रोवला (1) पायचीत केले. पाचव्या चेंडूवर त्याने ट्रॅव्हीस ब्रिटला (4) माघारी धाडले. ऑस्ट्रेलियाने मग ठराविक अंतराने विकेट गमावल्या. एकवेळ त्यांचा निम्मा संघ 30 धावांत परतला होता.
त्यानंतर रीअर्डन याने झुंजार प्रयत्न केले. तळाचे फलंदाज मात्र त्याला सुरवातीला साथ देऊ शकले नाहीत. त्यामुळे संघाची 15व्या षटकात 8 बाद 97 अशी घसरण झाली होती.
रिअर्डनला डोहर्टीने चांगली साथ दिली. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 17 धावांची गरज होती. त्यावेळी दिल्शानने स्वतःकडे चेंडू घेतला. डोहर्टीने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून रिअर्डन याला स्ट्राईक दिली. त्यानंतर रिअर्डन याने सलग दोन चौकार ठोकले, पण चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर डोहर्टीला दिल्शाननेच धावचीत केले.
संक्षिप्त धावफलक:
श्रीलंका लिजंड्स: 20 षटकांत 8 बाद 161 (तिलकरत्ने दिल्शान 18-14 चेंडू, 4 चौकार, रोमेश कालुवितरणा 30-28 चेंडू, 5 चौकार, मर्वान अटापट्टू 14, चमारा कपुगेदारा 28-18 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, अजंता मेंडिस 17, फरवीझ महारुफ नाबाद 20, झेव्हियर डोहर्टी 28-2, जेसन क्रेझा 37-2, ब्रॅड हॉज 2-18)
विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया लिजंड्स: 19.5 षटकांत सर्वबाद 154 (ब्रॅड हॅडीन 10, नेथन रिअर्डन 96-53 चेंडू, 9 चौकार, 5 षटकार, झेव्हीयर डोहर्टी 15, दिल्शान 35-3, रंगणा हेराथ 5-2, फरवीझ महारूफ 28-2)
पुढील सामना:
मंगळवार (दिनांक 10 मार्च)
इंडिया लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स