न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह पाहुण्या संघानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताचा हा पराभव ऐतिहासिक आहे, कारण 2012 पासून टीम इंडियानं घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. मात्र न्यूझीलंडनं ही मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारतासाठी या सामन्यात केवळ वॉशिंग्टन सुंदरनं चांगला खेळ केला. त्यानं एकूण 11 विकेट घेतल्या, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. विशेष म्हणजे, न्यूझीलंडनं भारतात प्रथमच कसोटी मालिका जिंकली आहे.
या सामन्यात भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण होतं फलंदाजांचं अपयश. पुणे कसोटीच्या दोन्ही डावांत कर्णधार रोहित शर्माला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर विराटनं दोन्ही डावांत मिळून केवळ 18 धावा केल्या. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील रिषभ पंतनं पहिल्या डावात 18 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्याला खातंही उघडता आलं नाही. बंगळुरू कसोटीतील शतकवीर सरफराज खान यावेळी कोणतीही जादू दाखवू शकला नाही. एकूणच, फलंदाजीतील अपयश हे टीम इंडियाच्या मालिका पराभवाचं प्रमुख कारण बनलं आहे.
या सामन्यातील भारताच्या पराभवामागचं आणखी एक कारण म्हणजे न्यूझीलंडच्या फिरकीपटूंची शानदार कामगिरी. पुण्याची खेळपट्टी काळ्या मातीपासून तयार करण्यात आली होती. फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर साथ मिळेल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. पण भारत आपल्याच जाळ्यात अडकेल, असं कोणाला वाटलं नव्हतं.
या सामन्यात टीम साऊदी हा विकेट घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज होता. त्यानं पहिल्या डावात एक विकेट घेतली होती. या सामन्यात फिरकीपटूंनी एकूण 38 बळी घेतले तर एक फलंदाज धावबाद झाला. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं एकूण 11, रविचंद्रन अश्विननं 5, मिचेल सँटनरनं 13, ग्लेन फिलिप्सनं 3 आणि एजाज पटेलनं 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाही 3 विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा –
पुणे कसोटीत रोहित ब्रिगेडचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियानं घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनी गमावली मालिका
“मी खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का?”, मनू भाकरची सोशल मीडियावर विचित्र पोस्ट
रिषभ पंत विराट कोहलीमुळे रनआऊट झाला? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुंपली!