बेंगळुरू । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गतविजेत्या बेंगळुरू एफसीला घरच्या मैदानावरील सलामीस नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतमोसमात प्ले-ऑफमध्ये नॉर्थईस्टचे कडवे आव्हान मोडून काढलेल्या बेंगळुरूला जेतेपद राखण्याच्या मोहीमेस विजयी प्रारंभ करता आला नाही. गोल झाला नसला तरी उल्लेखनीय चालींमुळे चुरस झाली.
येथील श्री कांतीरवा स्टेडियमवरील लढतीत दोन्ही संघांनी संधी दवडल्या. त्यामुळे कोंडी सुटू शकली नाही. बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू आणि नॉर्थईस्टचा शुभाशिष रॉय यांनी आपापले नेट सुरक्षित राखले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
यजमान बेंगळुरूची सुरवात आक्रमक होती. दुसऱ्याच मिनिटाला छेत्रीने उदांता सिंगला अप्रतिम पास दिला, पण त्यात थोडा जास्त जोर लागल्यामुळे नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉयने पटकन पुढे येत चेंडू ताब्यात घेतला. या चालीत छेत्रीची कल्पकता नक्कीच दिसली. पाचव्या मिनिटाला उदांताला मध्य क्षेत्रात चेंडू मिळाला. त्याने गोलच्या दिशेने आगेकूच सुरु केली. अंदाज घेत त्याने स्वतः प्रयत्न न करता उजवीकडे रॅफेल आगुस्टोला पास दिला. मध्यरक्षक आगुस्टोने बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने नेटच्या मध्य भागात चेंडू क्रॉस शॉटचा प्रयत्न केला, पण चेंडू ब्लॉक होऊन रॉयच्या हातात गेला.
सातव्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या राकेश प्रधानची घोडदौड करीत उदांताला रोखली. बेंगळुरूने चेंडूवर सरस ताबा राखत चाली सुरु ठेवल्या. 13व्या मिनिटाला आगुस्टोने एका प्रतिस्पर्ध्याला चकवित मॅन्युएल ओन्वूला डावीकडे पास दिला. ओन्वूने बॉक्समध्ये प्रवेश केला, पण नॉर्थईस्टच्या रेगन सिंगने मार्कींगची जबाबदारी चोख पार पाडत त्याला बाजूला जाण्यास भाग पाडले. ओन्वूने क्रॉस शॉट मारला, पण तो फिनीशिंग साधू शकला नाही.
बेंगळुरूच्या कुरुनीयन याने 17व्या मिनिटाला डावीकडून छान घोडदौड केली. तो उजवीकडे पास देऊ शकला असता, पण स्वतः प्रयत्न करीत त्याने फटका मारला, ज्यात अचूकता नव्हती. दोन मिनिटांनी नॉर्थईस्टच्या बचावानंतर छेत्रीपाशी चेंडू आला. त्याने फटका मारला, पण चेंडू नेटच्या उजवीकडून बाहेर गेला.
नॉर्थईस्टने 21व्या मिनिटाला पहिला प्रयत्न केला. मार्टिन चॅव्हेजने उजवीकडून बॉक्सलगत चेंडू मारला, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने चपळाईने बचाव केला. 27व्या मिनिटाला आगुस्टोने मध्य क्षेत्रातून चाल रचत पास दिल्यानंतर उदांताला अचूकता दाखविता आली नाही.
तीन मिनिटांनी बेंगळुरूला कॉर्नर मिळाल्यानंतर कुरुनीयनने मारलेला फटका नेटवरून गेला. नॉर्थईस्टने 35व्या मिनिटाला चांगली चाल दवडली. बेंगळुरूच्या बचाव फळीतील समन्वयाअभावी रेडीम ट्लांगकडे चेंडू गेला. त्याने गोलरक्षकाकडेच फटका मारला. रिबाऊंडवर चॅव्हेजला उत्तम संधी मिळाली, पण स्वैर फटक्यामुळे ती वाया गेली.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बेंगळुरूच्या आगुस्टो-उदांता, तर नॉर्थईस्टच्या ज्योस लेयूडो यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. 52व्या मिनिटाला आसामोह ग्यान याने चॅव्हेजच्या पासवर मारलेला चेंडू नेटच्या बारला लागला. निशू कुमार, रेगन यांचेही प्रयत्न फोल ठरले. अंतिम टप्यात हेच चित्र कायम राहिले.