नागपुर | शेष भारत विरुद्ध विदर्भ इराणी ट्राॅफी सामन्यात आज हनुमा विहारीने शानदार शतकी खेळी केली. त्याने २८१ चेंडूचा सामना करताना नाबाद १५३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १८ चौकार आणि २ षटकाराचा समावेश होता.
विशेष म्हणजे त्याने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. परंतु शेष भारत संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला मात्र आज एका चांगल्या विक्रमाला मुकावे लागले.
रहाणे आज शेष भारताच्या दुसऱ्या डावात ८७ धावांवर बाद झाला. २३२ चेंडूंचा सामना करत त्याने ६ चौकार व १ षटकार मारला. त्याचे हे शतक केवळ १३ धावांनी हुकले. त्याला यष्टीरक्षक अक्षय वाडकरने आदित्य सरवटेच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले.
अजिंक्य रहाणेच्या नावाची विश्वचषक २०१९च्या संघात राखीव सलामीवीर म्हणून जोरदार चर्चा आहे. यामुळे या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करणे गरजेचे होते. तसेच रहाणेबरोबर ज्या खेळाडूची विश्वचषकातील राखीव जागेसाठी स्पर्धा आहे त्या केएल राहुलनेही भारत अ कडून इंग्लंड लायन्सविरुद्ध ८१ धावांची खेळी केली आहे.
सध्या शेष भारताकडे २०३ धावांची आघाडी असून श्रेय़स अय़्यर १५ तर हनुमा विहारी १५३ धावांवर खेळत आहे. सामन्याचा आजचा चौथा दिवस असून दिवसातील शेवटचे सत्र सुरु आहे.






