---Advertisement---

इराणी ट्रॉफी शेष भारताकडेच! कुलदीप सेनच्या भेदक गोलंदाजी पुढे सौराष्ट्र बेदम

On: मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022 4:05 PM
---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामातील अखेरची प्रथमश्रेणी स्पर्धा असलेल्या इराणी ट्रॉफीच्या सामन्यात शेष भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघाने 2019-2020 रणजी हंगामाच्या विजेत्या सौराष्ट्राला आठ गडी राखून पराभूत करत विजय मिळवला. शेष भारत संघासाठी खेळणारा बंगालचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार हा सामन्याचा मानकरी ठरला.

 

राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी शेष भारत संघाने वर्चस्व गाजवले होते. मुकेश कुमारचे चार व कुलदीप याचे तीन बळी यांच्यामुळे घरच्या मैदानावर खेळत असतानाही सौराष्ट्र संघ ढेपाळला. त्यांना पहिल्या डावात केवळ 98 धावा करता आल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या शेष भारत संघाने नेटाने फलंदाजी केली. मुंबईचा सरफराज खान (138) याने आक्रमक शतक झळकावले. तर कर्णधार हनुमा विहारी (82) व सौरभ कुमार (55) यांच्या बहुमूल्य योगदानाच्या जोरावर शेष भारताने 374 धावांचा डोंगर उभारला.

दुसऱ्या डावात 270 पेक्षा जास्त धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी खेळायला आलेल्या सौराष्ट्राची सुरुवात पुन्हा एकदा खराबच झाली. केवळ 87 धावांमध्ये त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र, अर्पित वसावदा (55), प्रेरक मंकड (72) आणि कर्णधार जयदेव उनाडकत (89) यांच्या खेळामुळे सौराष्ट्राने 380 पर्यंत मजल मारली. शेष भारत संघासाठी वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने सर्वाधिक पाच बळी मिळवले. सौरभ कुमारने आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

शेष भारत संघाला विजयासाठी मिळालेले 105 धावांचे आव्हान गाठताना सुरुवातीला दोन धक्के बसले. मात्र, अभिमन्यू ईस्वरनच्या नाबाद 63 व श्रीकर भरतच्या नाबाद 27 धावांच्या जोरावर शेष भारताने अखेर आठ गडी राखून विजय आपल्या नावे केला. पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केलेल्या मुकेश कुमार याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.

यानंतर आता देशांतर्गत हंगामातील सर्वात मोठी टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळवली जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ढगाळ वातावरणात खेळला जाणार तिसरा टी-20 सामना, वाचा पावसाविषयीचा अंदाज
महिला टी20 विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---