नवी दिल्ली | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी दिल्ली डायनॅमोजची गतविजेत्या एटीकेविरुद्ध लढत होत आहे. आव्हान संपले असले तरी एटीकेला हरविल्यास दिल्ली आणखी प्रतिष्ठा कमावू शकेल.
स्पर्धेच्या अंतिम टप्यात दिल्लीने तळातील स्थानातून थोडी तरी प्रगती केली. एफसी गोवा संघाविरुद्धची बरोबरी दिल्लीसाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला मागे टाकून त्यांना नववा क्रमांक गाठता आला. गेल्या दोन सामन्यांत दिल्लीने खेळात सुधारणा केली आहे. त्यामुळे एटीकेविरुद्ध ते तीन गुणांच्या निर्धाराने उतरतील.
दिल्लीचे प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांनी सांगितले की, गेल्या सामन्यात गोव्याविरुद्ध आम्ही जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो. आमच्यासाठी तसेच क्लबच्या अध्यक्षांसाठी स्पर्धेची सांगता चांगली करायची असल्याचे मी नेहमीच म्हणालो आहे. खालचा क्रमांक चांगला नसल्याची त्यांना कल्पना आहे, पण आम्ही शेवट चांगला करू शकतो हे सुद्धा त्यांना ठाऊक आहे. त्यासाठी आम्हाला जिंकण्यासाठीच खेळावे लागेल.
स्पेनच्या मिग्युएल यांच्या मार्गदर्शनाखाली मोसमाच्या प्रारंभी दिल्लीचा संघ झगडत होता, पण आता त्यांना आत्मविश्वास गवसला आहे. गेल्या तीन सामन्यांत दिल्ली अपराजित आहे. चेन्नईयीनविरुद्ध 1-1 बरोबरी, नॉर्थईस्टवर 1-0 अशी मात, तर गोवा संघाविरुद्ध 1-1 बरोबरी अशी कामगिरी त्यांनी केली. 15 सामन्यांतून 12 गुणांसह त्यांचा नववा क्रमांक आहे. एटीके तेवढ्याच सामन्यांतून 13 गुणांसह आठवा आहे. जिंकल्यास दिल्ली एटीकेला मागे टाकू शकेल.
एटीकेसाठी हा मोसम अपवाद ठरला. गेल्या तिन्ही मोसमांत एटीकेने उपांत्य फेरी गाठली होती. दोन वेळा ते विजेते ठरले. यावेळी त्यांना प्रथमच अपयश आले. टेडी शेरींगहॅम यांना हटविल्यानंतर एटीकेने अॅश्ली वेस्टवूड यांना पाचारण केले. त्यानंतर एटीकेला विजय मिळालेला नाही. गेल्या पाच सामन्यांत वेस्टवूड यांना निर्णायक विजयाची प्रतिक्षा आहे. मुख्य म्हणजे यातील चार सामने त्यांनी गमावले. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांना बरोबरीचा एकमेव गुण मिळाला.
मागील सामन्यात एटीकेला मुंबई सिटीविरुद्ध 1-2 असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर वेस्टवूड म्हणाले की, आम्हाला गोल पत्करणे थांबवावे लागेल. आमचा संघ आक्रमणात चांगला आहे. आमच्यासाठी गमावण्यासारखे काहीच नाही. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आम्ही आक्रमक खेळासाठी आमचे क्षेत्र थोडे खुले करतो, पण वेगाने आक्रमण करतो.
संघाची पराभवांची मालिका थांबवून आयएसएलमधील पहिला विजय मिळविण्यासाठी वेस्टवूड आधीर झाले आहेत. काही परदेशी खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघावर परिणाम झाला आहे. स्टार स्ट्रायकर रॉबी कीन हा असताना आणि नसताना सुद्धा एटीकेने काही सामने जिंकले. त्यामुळे त्यांना विजयाचा आत्मविश्वास वाटू शकेल.