भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने मत मांडले आहे.
भारताचा युवा प्रतिभावान खेळाडू रिषभ पंत केवळ कुशल यष्टीरक्षणच करत नाही, तर धोनीसारखा जबरदस्त फलंदाजीही करतो. अशा परिस्थितीत पंतला धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात स्थान मिळेल, असे चाहत्यांना वाटू लागले. मात्र, आयपीएल 2020 मध्ये पंतला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. असे असूनही तो भारतीय संघात स्थान मिळवू शकतो, असा विश्वास भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याला आहे.
रिषभ पंतमध्ये उत्तम कामगिरी करण्याची क्षमता- हरभजन सिंग
रिषभ पंतच्या क्षमतेबद्दल बोलताना हरभजन म्हणाला की, “पंतला आयपीएलमध्ये अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही पण तो युवा आहे. आपल्याला माहित आहे की त्याच्याकडे उत्तम कामगिरी करण्याची क्षमता आहे आणि भविष्यातही तो उत्तम कामगिरी करू शकेल.”
पंत लवकरच करेल पुनरागमन
आयपीएलमधील खराब कामगिरीनंतरही पंतमध्ये पुनरागमन करण्याची क्षमता आहे, असा विश्वास दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगला आहे. “नुकत्याच झालेल्या आयपीएल 2020 मध्ये त्याला अधिक धावा करण्यात यश आले नाही पण आपल्याला माहित आहे की तो एक दर्जेदार खेळाडू आहे आणि जर खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये पुनरागमन करायचे असेल, तर त्याला त्याच्या क्षमतेनुसार धावा कराव्या लागेल. मला विश्वास आहे की तो लवकरच हे साध्य करेल,” असेही पुढे बोलताना हरभजन सिंग म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पंतची भारतीय संघात झाली निवड
पंतला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या पंतला आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी संघात स्थान मिळेल का हे पाहावं लागेल.
येत्या काही आठवड्यांमध्ये अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुखापतीतून सावरतो की नाही यावरही सर्वांचे लक्ष असेल.
मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पंतला संघात मिळाले नाही स्थान
आयपीएल 2020 मधील त्याच्या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती.
रिषभ पंतची आयपीएल 2020 मधील कामगिरी
पंतला आयपीएल 2020 मध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने 14 सामन्यांमध्ये 31.18 च्या सरासरीने 343 धावा केल्या. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 113.35 होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्याने हंगामातील एकमेव अर्धशतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सोपी खेळपट्टी मिळणार? पाहा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू काय म्हणतोय
… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर
मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण