आयपीएल २०२२च्या रणधुमाळीनंतर भारतभूमीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. येत्या टी२० विश्वचषक २०२२च्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे. या मालिकेत दमदार प्रदर्शन करत भारतीय खेळाडूंकडे टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळवण्याची सुवर्णसंधी असेल. यादरम्यान भारतीय संघातील अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात फिनिशर म्हणून संधी दिली जाऊ शकते, असे मत बऱ्याच क्रिकेटपटूंनी मांडले आहे. आता या रांगेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याचेही नाव जोडले गेले आहे.
कार्तिकने (Dinesh Karthik) आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) आपल्या प्रदर्शनाने खूप प्रभावित केले आहे. त्यामुळे त्याला टी२० विश्वचषकात (T20 World Cup) संधी दिली जावी, अशी इच्छा पाँटिंगची (Ricky Ponting) आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अर्थात आरसीबीचे प्रतिनिधित्त्व करताना कार्तिकने फिनिशरची भूमिका निभावली. त्याने आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सची कमी संघाला भासू दिली नाही. त्याने १६ सामने खेळताना ५५च्या सरासरीने आणि १८३.३३ च्या स्ट्राईक रेटने ३३० धावा फटकावल्या. त्याच्या याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याचे भारतीय संघातही पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवडले गेले आहे.
काय म्हणाला रिकी पाँटिंग?
‘द आयसीसी रिव्ह्यू’मध्ये ईशा गुहाशी बोलताना पाँटिंग म्हणाला की, “मला कार्तिकला विश्वचषक संघात ठेवायला आवडेल. मी त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवेल. कार्तिकने ज्याप्रकारे यावर्षी आरसीबीसाठी सामने फिनिश केले आहेत, त्याने त्याच्या खेळाला एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे.”
पाँटिंगने पुढे बोलताना म्हटले की, कार्तिकला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सहभागी न केले गेल्याने त्याला आश्चर्य होईल. पाँटिंग म्हणाला की, “तुम्ही आयपीएलमध्ये अपेक्षा करता की, संघातील जे चांगले खेळाडू आहेत, त्यांनी हंगामादरम्यान २-३ किंवा ४ सामने जिंकून द्यावे. जर कोणी खरोखरच असे केले, त्याचे चांगले परिणाम मिळतात. यावर्षी आरसीबीतील इतर खेळाडूंच्या तुलनेत कार्तिकचा प्रभाव जास्त राहिला. जर तो भारतीय संघाचा भाग नसेल, तर मला आश्चर्य वाटेल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा ख्रिस केर्न्स, राजासारखं जगूनही का झालीय त्याची दुर्दशा?
कुणी ‘आयएएस’, तर कुणी ‘आर्किटेक्चर’, वाचा किती शिकलेत तुमचे आवडते भारतीय क्रिकेटपटू