आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्जमध्ये मोठे बदल झाले आहेत. संघानं अलीकडेच ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. तर आता ट्रेव्हर बेलिस आणि संजय बांगर यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बेलिस पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक होते, तर बांगर क्रिकेट विकासाचे प्रमुख होते.
पंजाब किंग्जनं या दोघांशी संबंध तोडले आहेत. फ्रँचायझी बोर्डानं नुकताच हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली. या बोर्डात प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यासह चार सहमालकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचे ट्रेव्हर बेलिस यांनी आयपीएल 2023 पूर्वी पंजाब किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. ते दोन हंगाम या पदावर राहिले. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचा संघ एकदाही प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. संघ नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात नवव्या स्थानावर राहिला होता.
रिकी पाँटिंगच्या नियुक्तीनंतर बेलिसचं जाणं निश्चित मानलं जात होतं. परंतु संजय बांगर याचं जाणं आश्चर्यकारक आहे. संजय यांनी यापूर्वीही पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर टीम इंडियामध्ये सामील होण्यासाठी त्यांनी फ्रँचायझी सोडली. ते 2023 मध्ये पुन्हा पंजाब किंग्जमध्ये परतले होते.
आयपीएल 2025 पूर्वी रिकी पाँटिंगसमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते संघात खेळाडू टिकवून ठेवणे आणि नंतर कर्णधाराची निवड करणे. बीसीसीआय लवकरच मेगा लिलावाचे नियम जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब किंग्जचा संघ कदाचित काही निवडक खेळाडूंनाच रिटेन करण्याचा प्रयत्न करेल.
गेल्या काही हंगामांपासून संघाची कमान शिखर धवनकडे होती, जो आता निवृत्त झाला आहे. धवनच्या अनुपस्थिती सॅम करननही कर्णधाराची भूमिका निभावली होती. मात्र फ्रँच्याईजी करनला कायमस्वरुपी कर्णधार बनवण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत ते मेगा लिलावात नव्या कर्णधाराच्या शोधात असतील.
हेही वाचा –
विराट कोहली विरुद्ध जो रुट वादात युवराज सिंगची उडी! सांगितलं कोणता खेळाडू सर्वोत्तम
काय सांगता! भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याचं तिकीट फक्त 342 रुपयांना! या दिवशी होणार ‘महामुकाबला’
राशिद खाननं केला वयाचा घोटाळा? अफगाणिस्तानच्या कर्णधारानं सांगितलं खरं वय