ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याने नुकतीच तीन भारतीय खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे येत्या काळात त्यांच्या प्रदर्शनाने जगभरात स्वतःचे नाव करू शकतात. आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदी पॉंटिंग कार्यरत आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या युवा खेळाडूंची गुणवत्ता पाहून पॉंटिंग चांगलाच प्रभावित झाला आहे. आयसीसी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पॉंटिंगने तीन युवा खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे भविष्यात मोठे नाव करू शकतात.
पॉंटिंगने निवडलेल्या तीन युवा खेळाडूंमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड यांची नावे घेतली आहेत. पॉंटिंग म्हणाला की, “यामध्ये आम्ही रिटेन केलेला पृथ्वी शॉ आहे, ज्याने मागच्या आयपीएल हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते. मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्याविषयी सर्वकाही प्रत्येकाला माहिती आहे. मला अजूनही वाटते की, एका व्यक्तीच्या रुपात तो स्वतःविषयी खूप काही शिकत आहे आणि खेळाडूच्या रूपातही खूप काही शिकत आहे. तो असा खेळाडू आहे, जेव्हा त्याला चांगली फलंदाजी करता येत नाही, तेव्हा तो जास्त फलंदाजी करू इच्छित नसतो. जेव्हा तो चांगली फलंदाजी करत असतो, तेव्हा त्याला प्रत्येक वेळी फलंदाजी करण्याची इच्छा असते.”