Rinku Singh : श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शनिवारी (27 जुलै) सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळेल. तसेच गौतम गंभीर हा या सामन्यातून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी, सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एका व्हिडिओमध्ये, जेव्हा रिंकू सिंगला विचारण्यात आले की, तुला सूर्यकुमारची बॅट मिळाली आहे का? तेव्हा त्याने उत्तर दिले की, ‘नाही, मला अद्याप बॅट मिळालेली नाही. मात्र, मी विराट कोहलीने दिलेली बॅट वापरत आहे.’ श्रीलंकेत पोहोचल्यानंतर रिंकूने सूर्याकडून इंस्टाग्रामवर बॅट मागितली तेव्हा कर्णधार सूर्याने रिंकूसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सूर्याने लिहिले होते, ‘ठीक आहे बॅट घेऊन टाक’.
श्रीलंकेत पोहोचल्यानंतर रिंकू याने एक फोटो पोस्ट करत, सूर्यकुमारकडे बॅट मागितली होती. त्यामुळे त्याला हा प्रश्न विचारला गेला.
रिंकू सिंगसाठी आयपीएल 2024 काही खास राहिली नव्हते. त्यानंतर 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. तरीही रिंकू सिंगचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आलेला. हा दौरा रिंकूसाठी चांगला गेला. या दौऱ्यावर रिंकूने चार डावात 60 धावा केल्या होत्या. यात नाबाद 48 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्यानंतर आता रिंकूचा श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंका दौऱ्यावर रिंकूकडे भारतीय संघाचा फिनिशर म्हणून आपली जागा नक्की करण्याची संधी असेल. तो सहाव्या स्थानी फलंदाजी करू शकतो. त्यासोबतच अष्टपैलू शिवम दुबे व अक्षर पटेल हे त्याला आव्हान देतील. रिंकू गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली खेळला असल्याने, त्याला पहिली संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा –
आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
पांड्या नव्या भूमिकेत, प्रशिक्षक गंभीरचा फॉर्म्युला टीम इंडियाला टी20 मालिका जिंकण्यास मदत करेल का?
शुबमन गिलचं प्रमोशन! वनडे-टी20 पाठोपाठ कसोटी संघातही मिळू शकते मोठी जबाबदारी