दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेत अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळत आहेत. मात्र स्फोटक फलंदाज रिंकू सिंहची या स्पर्धेसाठी निवड झाली नव्हती.
दरम्यान, रिंकूबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या स्पर्धेसाठी रिंकू सिंहला पाचारण करण्यात आलंय. रिंकू दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाचा भाग असेल. वास्तविक, रिंकू सध्या उत्तर प्रदेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. परंतु तो लवकरच दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया बी संघात सामील होईल.
दुलीप ट्रॉफीसाठी बोलावणं आल्यानंतर रिंकू सिंहनं यावर आपली प्रतिक्रिया दिली. रिंकूनं सांगितलं की, तो मेहनत करतो आणि भविष्याचा विचार करत नाही. रिंकू सिंह म्हणाला, “माझं काम सतत मेहनत करणं आहे. दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाल्यानं मला खूप आनंद झाला. संघ जाहीर झाले तेव्हा माझी निवड झाली नव्हती. तेव्हा मी निराश झालो होतो. माझं काम कठोर परिश्रम करण्याचं आहे, जे मी करतोय. प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी येथे आलो असल्यामुळे आणखीनच उत्साहित आहे.”
रिंकू सिंह सध्या उत्तर प्रदेश टी20 लीगमध्ये खेळतोय. स्पर्धेत तो मेरठ मावेरिक्सचं प्रतिनिधित्व करतो. संघानं आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 8 जिंकले आहेत.
रिंकू सिंहच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यानं 2 एकदिवसीय आणि 23 टी20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये 45 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये रिंकूनं 134.15 चा स्ट्राइक रेट आणि 27.5 च्या सरासरीनं 55 धावा केल्या आहेत. तर टी20 फॉरमॅटमध्ये रिंकूच्या नावावर 418 धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 174.17 आणि सरासरी 59.71 आहे. आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं 143.34 चा स्ट्राइक रेट आणि 30.79 च्या सरासरीनं 893 धावा केल्या.
हेही वाचा –
“सचिन-धोनी नाही, तर हा माझा आवडता फलंदाज”; स्मृती मंधानानं केला खुलासा
जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला? संघातील हे महत्त्वाचं पद गेलं, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ
गौतम गंभीरनंतर कोण बनणार केकेआरचा मेंटॉर? 2 आयपीएल जिंकणाऱ्या दिग्गजाचं नाव आघाडीवर