क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्या दरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत भारताचा डाव ३६४ धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने या पहिल्या डावात ३७ धावा करत भारतीय क्रिकेटमधील एक नवा विक्रम आपल्या नावे केला.
पंतची वेगवान खेळी
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीचे नाबाद फलंदाज केएल राहुल व अजिंक्य रहाणे केवळ दोन धावांची भर घालून माघारी परतले. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या यष्टीरक्षक रिषभ पंतने वेगवान फलंदाजी करत ५ चौकारांच्या मदतीने ५८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. त्याने रवींद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली. मार्क वूडने एका आउट स्विंग चेंडूवर त्याला यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
हा विक्रम केला आपल्या नावे
आपल्या ३७ धावांच्या छोटेखानी खेळी दरम्यान रिषभ पंतने भारतीय क्रिकेटमधील एक विक्रम आपल्या नावे केला. रिषभ सर्वात कमी डावांमध्ये १००० कसोटी धावा बनविणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला. त्याने केवळ २९ डावांमध्ये ही कामगिरी साध्य केली. यापूर्वी ही कामगिरी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावे होती. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा बनवण्यासाठी ३२ डाव घेतले होते. भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनियर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा काढण्यासाठी ३३ डाव खेळलेले.
संघाचा नियमित यष्टीरक्षक बनला आहे रिषभ
रिषभ पंत मागील काही काळापासून भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी पुनरागमन केलेल्या रिषभने सिडनी व ब्रिस्बेन कसोटीत शानदार खेळ करत संघाला मालिका विजय मिळवून दिला होता. त्यानंतर, मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने भारतीय संघासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा फटकावलेल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकींग! विश्वविजेत्या भारतीय कर्णधार उन्मुक्त चंदने केली निवृत्तीची घोषणा
इंग्लंडचे लॉर्ड्स मैदान रंगले लाल रंगात, काय आहे कारण? घ्या जाणून