शुक्रवारपासून (९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. त्यानंतर १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होईल. या सामन्यात दिल्लीचे नेतृत्व रिषभ पंत करणार आहे. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून रिषभ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. या नव्या जबाबदारीसह तो देखील खेळण्यास सज्ज असल्याचे दिल्लीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
आयपीएल सुरु होण्याआधी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त
खरंतर दिल्ली कॅपिटल्सचे गेले २ हंगामात श्रेयस अय्यरने कर्णधारपद सांभाळले आहे. अगामी १४ व्या आयपीएल हंगामातही तोच दिल्लीचा कर्णधार असणार होता. मात्र, या हंगामापूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याला खांद्याची दुखापत झाली, ज्यामुळे त्याला या हंगामाला मुकावे लागले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी या हंगामात दिल्लीचे नेतृत्व २३ वर्षीय रिषभ पंतच्या हाती देण्यात आले आहे.
पंत आयपीएल २०२१ साठी सज्ज
पंत नेतृत्वाच्या जबाबदारीसह नव्या हंगामासाठी सज्ज असल्याचे नुकतेच दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमधून दिसले आहे. दिल्लीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिषभ पंत त्याच्या संघसहकाऱ्यांशी मजा-मस्ती आणि गप्पा मारताना दिसत आहे. तसेच तो मुख्यप्रशिक्षक रिकी पाँटिंगशीही चर्चा करताना दिसत आहे. याबरोबरच तो जोरदार सरावही करताना या व्हिडिओमध्ये दिसतो.
या व्हिडिओला दिल्ली कॅपिटल्सने कॅप्शन दिले आहे की “कर्णधार आला आहे आणि तो एका उद्देशाने इथे आला आहे. रिषभ पंत आयपीएल २०२१ च्या मिशनवर आहे.”
https://www.instagram.com/p/CNVYXSYhWYe/
या हंगामात रिषभ पहिल्याच सामन्यात करणार विक्रम
दिल्लीला या हंगामातील पहिला सामना ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १० एप्रिलला खेळायचा आहे. या सामन्याच्या दिवशी रिषभ पंतचे वय २३ वर्षे १८८ दिवस इतके असेल.
त्याचमुळे तो आयपीएलमध्ये नेतृत्व करणारा पाचव्या क्रमांकाचा सर्वात युवा कर्णधार ठरणार आहे. सध्या आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तो २२ वर्षे १८७ दिवस इतके वय असताना पहिल्यांदा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये खेळला होता. त्याच्या पाठोपाठ स्टिव्ह स्मिथ(२२ वर्षे ३४४ दिवस), सुरेश रैना(२३ वर्षे ११२ दिवस) आणि श्रेयस अय्यर(२३ वर्षे १४१ दिवस) आहे. आता या यादीत पाचव्या क्रमांकावर रिषभचा समावेश होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल सात वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणार असलेल्या पुजाराची अशी आहे टी२० कारकिर्द; एक शतकही आहे नावावर
आयपीएलमध्ये बीसीसीआय आणि खेळाडूंची होती इतक्या कोटींची कमाई; पाहून बसेल आश्चर्याचा धक्का
काय सांगता! आता दुकानांमध्ये विकेले जाणार धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ प्रेरित चॉकलेट