आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. हा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाचा हंगामातील सलग दुसरा पराभव होता. या सामन्यात ऋषभ पंतनं 26 चेंडूत 28 धावा केल्या, जे की त्याच्या नेहमीच्या स्फोटक शैलीच्या विपरीत होतं. बाद झाल्यानंतर ऋषभ पंत स्वतःवर खूप नाराज दिसत होता. पंतचा संयम सुटला आणि दिल्लीच्या कर्णधारानं रागाच्या भरात भिंतीवर बॅट मारली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऋषभ पंत युजवेंद्र चहलच्या चेंडूवर बाद झाला. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या 13.1 षटकात 4 विकेट गमावून 105 धावा होती. पॅव्हेलियनमध्ये परतताना ऋषभ पंत चांगलाच संतापलेला दिसत होता. त्यानं रागाच्या भरात आपली बॅट भिंतीवर आपटली, ऋषभ पंतचा असं करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Rishab disappointed, angry and hitting curtains with bat after getting out. #DCCultChoopistham#RRvsDC pic.twitter.com/XcVVXB45Wv
— CoffeeBoy (@Dhana38405223) March 28, 2024
दिल्ली कॅपिटल्सचे या हंगामात सलग दोन पराभव झाले आहेत. यापूर्वी पंजाब किंग्जनं त्यांचा 4 गडी राखून पराभव केला होता. आता राजस्थान रॉयल्सनं त्यांना 12 धावांनी धूळ चारली आहे. दिल्लीचा पुढीला सामना 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आहे. हा सामना विशाखापट्टनम येथे खेळला जाईल.
कालच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सनं 20 षटकात 5 गडी गमावून 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकांत 5 गडी गमावून 173 धावाच करू शकला. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं 34 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सनं 23 चेंडूत 44 धावांची खेळी केली. मात्र हे दोघं संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. राजस्थान रॉयल्सकडून बर्गर आणि चहल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
तत्पूर्वी, राजस्थानकडून रियान परागनं धमाकेदार फलंदाजी केली. त्यानं 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं नाबाद 84 धावा ठोकल्या. अश्विननं 19 चेंडूत 29 आणि ध्रुव जुरेलनं 12 चेंडूत 20 धावांचं योगदान दिलं. परागनं डावातील अखेरच्या षटकात नॉर्कियाला 25 धावा हाणल्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्सनं 20 षटकांत 185 धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी राजस्थानला शेवटच्या 10 षटकांत सहज धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रियान परागनं टाकलं विराट कोहलीला मागे, पर्पल कॅपवर ‘या’ विदेशी खेळाडूचा कब्जा
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?