नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा 3-0 असा क्लीन स्वीप झाला असला, तरी रिषभ पंतची फलंदाजी भारतासाठी सकारात्मक होती. कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर सुमारे 1 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिलेल्या पंतनं कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे.
रिषभ पंतनं न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतकं झळकावली, ज्याचा त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत पंतनं जबरदस्त झेप घेतली. तो आता पुन्हा कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठण्याच्या अगदी जवळ आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एका धावेनं शतक हुकलेला पंत दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला होता. असं असूनही तो टॉप-15 मध्ये कायम राहिला. शेवटच्या कसोटीतील दमदार कामगिरीच्या जोरावर त्यानं पाच स्थानांनी झेप घेतली असून तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. रिषभ पंत फेब्रुवारी 2022 मध्ये कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला होता, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. आता पाचव्या क्रमांकावर असलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि पंत यांच्या रेटिंगमध्ये केवळ सात गुणांचा फरक आहे.
गेल्या आठवड्यातील क्रमवारीत टॉप 20 मधून बाहेर पडलेला रोहित शर्मा आणखी दोन स्थानांनी घसरला आहे. याशिवाय विराट कोहलीही टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. कोहली आता 22व्या तर रोहित 26व्या क्रमांकावर आहे. पंत व्यतिरिक्त टॉप-10 मध्ये केवळ यशस्वी जयस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. मात्र यशस्वीचीही एका स्थानाची घसरण होऊन तो चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. जो रूट सध्या जगातील नंबर वन कसोटी फलंदाज आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत रवींद्र जडेजानं झेप घेतली आहे. तो दोन स्थानांनी पुढे सरकून सहाव्या स्थानावर पोहोचला. मात्र रविचंद्रन अश्विन एक स्थान गमावून पाचव्या स्थानावर आला आहे. जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. टॉप-10 मध्ये सर्वाधिक गोलंदाज भारत आणि ऑस्ट्रेलियाचे आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा पहिल्या आणि अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.
हेही वाचा –
कमबॅक असावा तर असा! बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला प्रथमच मिळाली मोठी जबाबदारी
रिकी पाँटिंगची भविष्यवाणी! बॉर्डर-गावस्कर मालिकेत हा भारतीय खेळाडू करेल सर्वाधिक धावा
“रोहित शर्मा म्हातारा होतोय, त्यानं निवृत्ती…”, भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य