भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आठ धावांनी विजय संपादन केला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाला मोठी धावसंख्या रचून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या रिषभ पंत याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र, त्याच वेळी त्याने एक वक्तव्य केल्याने अनेक चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत.
रिषभने खेळली शानदार खेळी
मालिकेतील पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या रिषभने दुसऱ्या सामन्यात अत्यंत आक्रमक खेळ केला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रिषभने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी केली. त्याने अवघ्या २७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद ५२ धावांची खेळी केल्याने भारतीय संघाने १८६ धावा धावफलकावर लावल्या. त्याच्यात महत्त्वपूर्ण खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना रिषभ म्हणाला,
“संघ देईल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी तयार आहे. व्यंकटेशसोबत खेळताना खूप चांगले वाटले. आम्ही जास्त मोठा विचार न करता चेंडूला त्याच्या योग्यतेनुसार मारण्याचा प्रयत्न करत होतो. मी जे करतो त्याचा केवळ आनंद घेत असतो. तसेच, रॉवमन पॉवेल अगदी बंदुकीच्या गोळीप्रमाणे फटके मारत होता. ते पाहून मी थोडे फार खुश झालो होतो. कारण, आयपीएलमध्ये तो दिल्ली संघाचा भाग आहे. मात्र, अखेरीस भारतीय संघ जिंकला याचा आनंद जास्त असतो.”
रॉवमन पॉवेल याने या सामन्यात वेस्ट इंडिज संघासाठी तुफानी अर्धशतक झळकावले. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. आगामी आयपीएलमध्ये पॉवेल दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना दिसेल. दिल्लीने त्याच्यावर ४ कोटींपेक्षा अधिकची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-