Rishabh Pant Century: भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत (Headingley Test) त्याने आपल्या आक्रमक अंदाजात म्हणजेच षटकार मारून कसोटी शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा असे घडले आहे की, पंतने इंग्लंडच्या फिरकीपटूंविरूद्ध षटकार खेचून शतक पूर्ण केले आहे. यापूर्वी त्याने आदिल रशीद आणि जो रूट यांच्याविरुद्ध हा पराक्रम केला होता, आणि आता शोएब बशीरला (Shoaib Bashir) लक्ष्य केले.
हा पराक्रम करत पंतने भारतासाठी एक अनोखा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारून सर्वाधिक शतके पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने रोहित शर्माची (Rohit Sharma) बरोबरी केली आहे, दोघांनीही प्रत्येकी 3 वेळा असे केले आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 6 वेळा हा पराक्रम करून अव्वल स्थानी आहे. (Rishabh Pant Sixer Century Record)
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शुबमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली खेळत असलेल्या युवा भारतीय संघासाठी पंतची ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, मधल्या फळीत पंतची भूमिका निर्णायक ठरत आहे. इंग्लंडमधील खडतर परिस्थितीत, जिथे चेंडू खूप स्विंग होतो आणि फिरकीपटूंनाही मदत मिळते, तिथे पंतने आपला दम दाखवत शानदार शतकी खेळी केली.