भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली हे क्रिकेट क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. सौरव हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जातात. तसेच क्रिकेट प्रशासनातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दरम्यान असे समजत आहे की त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची देखील संधी मिळाली होती, पण त्यांनी ती नाकारली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमादरम्यान सौरव म्हणाले की, “मी चित्रपटांमध्ये काम करणार नाही हे सर्वांनाच ठाऊक होते. टीव्हीवरील माझ्या शोमध्ये मी आनंदी होतो. तसेच जोडीला क्रिकेट आणि रियालिटी शो होतेच. त्यामुळे मी चित्रपटांमध्ये काम करण्यास तयार नव्हतो. पण ऋतुपर्णो घोष यांनी मला चित्रपटांमध्ये काम करण्याचा आग्रह केला. मात्र मी त्यांना नकार दिला होता. झाले असे की, एके दिवशी त्यांनी मला फोन केला व सांगितले की, मी एक चित्रपट बनवणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही माझे नायक असाल.”
सौरव पुढे म्हणाले, “मी त्यांना नाकार दिला आणि म्हणालो की त्याऐवजी तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक करा, मी तुमच्या घरी जेवायला येत आहे. माझे घोष यांच्याशी फार चांगले संबंध होते. जेव्हा घोष यांचा मृत्यू झाला (2013) तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो. ते एक अतिशय नम्र व्यक्ती होते आणि स्वतःच्या अटींवरच जीवन जगत होते.”
दरम्यान, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ऋतुपर्णो घोष यांचा उल्लेख बंगाली सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्तम निर्मात्यांमध्ये केला जातो.
विशेष म्हणजे, सौरव यांचा ” दादागिरी अनलिमिटेड” नावाचा एक टिव्ही कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम झी बंगालावर प्रसारित होतो. ज्यात जगभरातील ख्यातनाम व्यक्ती येतात. विशेष म्हणजे सौरव यांचा हा कार्यक्रम बंगाली भाषेतील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रम असून आपल्या लाडक्या दादाला टिव्हीवर बघून संपूर्ण बंगालचे लोक खूष होतात.
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशने सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा ३३ धावांनी पहिल्या वनडेत उडवला धुव्वा
आयपीएलमध्ये खेळणार का? पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने दिले ‘हे’ उत्तर





