भारतीय संघाचे वेळापत्रक सध्या खूप व्यस्त आहे. सध्या भारतीय संघ यूएईमध्ये टी२० विश्वचषक खेळत आहे. त्यानंतर संघ नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचे खेळाडू मागच्या बऱ्याच दिवसांपासून संघासोबत दौरे करत आहेत. अशात न्यूझीलंडविरुद्ध मालिकेदरम्यान संघातील काही खेळाडूंना विश्रांती देऊन काही युवा खेळाडूंनी या मालिकेत खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील मालिकेत कोणते कोणते खेळाडू विश्रांती घेतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. असा अंदाज बांधला जात आहे की, या मालिकेत युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळू शकते. युवा खेळाडूंमध्ये प्रामुख्याने ऋतुराज गायकवाडचे या मालिकेसाठी नाव घेतले जात आहे. ऋतुराजने यापूर्वी श्रीलंका दौऱ्यादरम्यान त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण केले होते. मात्र, तो या दौऱ्यात काही खास कमाल करू शकला नव्हता. असे असले तरी, त्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त प्रदर्शन केले.
त्याने आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शानामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. इंसाईड स्पोर्ट्सने याविषयी माहिती दिली आहे. वृत्तानुसार ऋतुराजला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारतीय संघात स्थान मिळू शकते. ऋतुराजचा चांगला फॉर्म आयपीएलनंतरही कायम आहे. त्याने सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने या स्पर्धेत तीन सामन्यात २१२ धावा केल्या आहेत. ऋतुराजव्यतिरिक्त वेंकटेश अय्यरचेही नाव या मालिकेत संधी मिळण्यासाठी चर्चेत आहे. वेंकटेश अय्यरने यावर्षी आयपीएलमध्ये उत्कृष्ट अष्टपैलू प्रदर्शन केले होते. तो हार्दिक पांड्याला पर्यायी खेळाडू ठरू शकतो.
या दोघांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या इतरही खेळाडूंचे नाव या मालिकेसाठी चर्चेत आहेत. दरम्यान, न्यूजीलंडविरुद्धची टी२० मालिका १७ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे १९ आणि २१ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. टी२० मालिकेनंतर या दोन संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जाईल, ज्याचे सामने मुंबई आणि कानपूरमध्ये होतील.