देवधर ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (3 ऑगस्ट) खेळला गेला. पॉंडेचेरी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण विभागाने पूर्व विभागाचा 45 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. पूर्व विभागाला अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले असले तरी, संघाचा अष्टपैलू रियान पराग हा स्पर्धेचा मानकरी ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरी करत टीकाकारांची तोंडे बंद केली.
परागच्याच उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अखेरच्या साखळी सामन्यात पश्चिम विभागाला पराभूत करत पूर्व विभागाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात देखील संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. त्याने आपल्याकडून असलेली ही अपेक्षा पूर्ण करताना अंतिम सामन्यात आधी 68 धावा देताना दोन बळी टिपले होते. त्यानंतर 329 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ अडचणीत आल्यावर त्याने केवळ 65 चेंडूंमध्ये 95 धावांची तुफानी खेळी केली. तो बाद झाल्यानंतर इतर फलंदाज अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने संघाला पराभवाचा धक्का बसला. असे असले तरी त्याला स्पर्धेचा मानकरी म्हणून घोषित केले गेले.
देवधर ट्रॉफी स्पर्धेत रियान पराग याने 5 सामन्यात 2 शतक व एका अर्धशतकाच्या मदतीने 354 धावा चोपल्या. विशेष म्हणजे, रियानने यादरम्यान 30 चौकार आणि सर्वाधिक 23 षटकारही मारले आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 5 सामन्यात 11 विकेट्सही घेतल्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या इमर्जिंग एशिया कपमध्ये देखील गोलंदाजी तो चमकला होता.
यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी त्याने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीत तो कमालीचा अपयशी ठरलेला. त्यानंतर झालेल्या टीकेला त्याने आपल्या या प्रदर्शनाने उत्तर दिले आहे.
(Riyan Parag Awarded Man of The Tournament In Deodhar Trophy For His All Round Performance)
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचे वर्ल्डकप तिकीट कन्फर्म! ‘हे’ कारण देत दिग्गजानेच उमटविली मोहोर
“संजू विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकाचा दावेदार”, दिग्गजाने दिली पसंती