‘फिनिशर’ म्हणजे सामन्यातील अंतिम षटकात फलंदाजीला येत संघाला गोड शेवट करुन देणारा फलंदाज. भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी याला जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशरपैकी एक मानले जाते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघनायक असलेला धोनी या संघासाठीही फिनिशरची भूमिका साकारताना दिसतो. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक अनुभवी आणि युवा शिलेदारांनी आयपीएलमध्ये फिनिशरच्या रुपात ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक नाव, रियान पराग याचे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याने राजस्थान रॉयल्सच्या या १९ वर्षीय फलंदाजाला फिनिशर बनण्यासाठी प्रवृत्त केले होते. याबाबत स्वत: रियानने खुलासा केला आहे. वयाच्या १७ व्या वर्षीय आयपीएलमध्ये पाऊल ठेवणाऱ्या रियानने क्रिकबजशी बोलताना यासंबंधी उलगडा केला आहे.
“जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी माझ्या वयोगटातील सर्व संघ सहकाऱ्यांमध्ये छोटा होतो. मुळात वयाच्या १२ व्या वर्षी मी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. मी वयाच्या १४व्या वर्षी १६ वर्षांखालील क्रिकेट खेळले होते. १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये खेळताना मी १७ वर्षांचा होतो. अशाप्रकारे मला नेहमीच माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या क्रिकेटपटूंसोबत खेळण्याचा अनुभव आला आहे. मी १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करायचो. परंतु आयपीएलमध्ये मला फिनिशरची भूमिका साकारताना कसलीही अडचण आली नाही,” असे रियानने सांगितले.
पुढे तो म्हणाला, “दोन वर्षांपुर्वी विराट कोहलीशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती. यावेळी त्याने विशेषता मला म्हटले होते की, मी ऑरेंज कॅप कधीही जिंकू शकणार नाही. मी सहसा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. यामुळे ऑरेंज कॅपचा विचार सोडून टाकण्याचा त्याने मला सल्ला दिला होता. कारण या क्रमांकावर फलंदाजीला येत माझ्या संघासाठी महत्त्वाच्या २०-३० धावा बनवण्याची भूमिका मी साकारावी अशी त्याची इच्छा होती. त्याची ही गोष्ट माझ्या डोक्यात बसली. तेव्हापासून मी किती धावा करतो याची पर्वा न करता मी किती धावा केल्याने संघाला फायदा होईल याचा विचार करतो.”
रियानने २०१९ साली राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात फिनिशरची भूमिका साकारताना संघाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. या सामन्यात अंतिम षटकात फलंदाजीला येत त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारत ४३ धावांची खेळी केली होती. यासह राजस्थानने तो सामना जिंकला होता.
या सामन्याबद्दल रियानने सांगितले की, “त्या सामन्यामुळेच मला कळाले की, मी फिनिशरची भूमिका निभावण्यास योग्य आहे. त्यावेळी मला स्वत:वर विश्वास नव्हता. परंतु मी खेळत गेलो आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. एकवेळ अशी आली की, मी या क्रमांकावर खेळण्यास लायक आहे आणि माझ्या संघाला गोड शेवट करुन देऊ शकतो, असा विचार माझ्या मनात आला. आणि मी ते करुन दाखवले.”