मुंबई। ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थानने ५ विकेट्सने विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान पक्के केले. या सामन्यात खेळताना राजस्थान रॉयल्सचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू रियान पराग याने क्षेत्ररक्षणात दमदार कामगिरी करत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
रियान परागने (Riyan Parag) या सामन्यात २ झेल घेतले. त्यामुळे त्याचे आता आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) एकूण १५ झेल पूर्ण झाले आहेत. त्याचमुळे तो आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना मागे टाकले आहे.
जडेजाने २०२१ आणि २०१५ सालच्या हंगामात प्रत्येकी १३ झेल घेतले होते. तसेच रोहित शर्माने २०१२ हंगामात १३ झेल घेतले होते. सध्या रोहित आणि जडेजा दोघेही सक्रिय क्रिकेटपटू असून रोहित आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तर रविंद्र जडेजा आयपीएल २०२२ मधून दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. विशेष म्हणजे या हंगामात त्याला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधारही करण्यात आले होते. पण चेन्नईची कामगिरी त्याच्या नेतृत्वाखाली खालावल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले होते.
पराग मोडू शकतो डिविलियर्सचा विक्रम
दरम्यान, आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक झेल घेणाऱ्या एकूण क्षेत्ररक्षकांच्या यादीत एबी डिविलियर्स (AB de Villiers) अव्वल क्रमांकावर आहे. त्याने २०१६ मध्ये आयपीएल हंगामात १९ झेल घेतले होते. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रियान पराग आणि कायरन पोलार्ड संयुक्तरित्या विराजमान आहेत. पोलार्डनेही २०१७ सालच्या आयपीएल हंगामात १५ झेल घेतले होते.
आता राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२२ प्लेऑफच्या फेरीत पोहचले आहेत. तसेच त्यांची क्वालिफायर १ मधील जागा पक्की आहे. त्यामुळे त्यांना अजून किमान २ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचमुळे परागकडे आता डिविलियर्सचा १९ झेलांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी असणार आहे (Most catches by a fielder in an IPL season).
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक
१९ झेल – एबी डिविलियर्स, २०१६
१५ झेल – रियान पराग, २०२२
१५ झेल – कायरन पोलार्ड, २०१७
१४ झेल – डेव्हिड मिलर, २०१४
१४ झेल – ड्वेन ब्रावो, २०१३
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
Video: मोईन अलीसमोर ट्रेंट बोल्टही हतबल, ओव्हरमधील सर्व ६ चेंडू केले सीमापार
वेध आशिया चषक अन् टी२० विश्वचषकाचे! भारतीय दिग्गजाने निवडली संभावित टीम इंडिया, ‘या’ खेळाडूंना संधी
शेन वॉर्न त्याला ‘गोव्याची तोफ’ म्हणायचा, वाचा त्या स्वप्निल अस्नोडकरची संघर्षगाथा