भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. दोन वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या सूर्याने मागील सहा महिन्यांपासून टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान टिकवून ठेवले आहे. त्याच्या या सातत्यापूर्ण खेळामुळे वनडे व आता कसोटी संघातही त्याची निवड झाली. त्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने सूर्या आगामी विश्वचषकात भारतीय संघाचा एक्स-फॅक्टर असेल असे म्हटले.
रॉबिन सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धा खेळत आहे. तेथे तो एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला
“भारतात होऊ घातलेल्या विश्वचषकात अनेक खेळाडूंकडे एक्स-फॅक्टर म्हणून पाहता येईल. मात्र, माझ्यासाठी एक्स-फॅक्टर म्हणून सर्वात वरचे नाव सूर्यकुमार यादव याचे आहे. त्याला श्रीलंकेविरुद्ध फारशी संधी मिळाली नाही. मात्र, जे खेळाडू नियमित संघात आहेत, त्यांच्यावर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल. कारण, सूर्यासारख्या खेळाडूला तुम्ही जास्त काळ बाकावर बसवू शकत नाही.”
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकासाठी यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
सूर्याच्या टी20 प्रदर्शनाचा विचार केला, तर या प्रकारात त्याने आतापर्यंत 45 सामने खेळले आहेत. यापैकी 43 सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली आणि 46.41 च्या सरासरीने 1578 धावा केल्या आहेत. टी20 प्रकारात त्याने तीन शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 180.34 राहिला आहे.
टी20 प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमारला वनडे क्रिकेटमध्ये मात्र अद्याप अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. त्याने भारतासाठी आतापर्यंत 17 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 16 वेळा त्याला खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये 29.85 च्या सरासरीने 388 धावा केल्या. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी देखील त्याला संघात स्थान मिळाले आहे.
(Robbin Uthappa Said Suryakumar Yadav Is X Factor For India In 2023 ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे वादळी शतक, विक्रम मोडणे विराट कोहलीसाठीही अशक्य
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध