टेनिस सम्राट रॉजर फेडररने २०१७च्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा ह्या महिन्याच्या शेवटी २८ तारखेला सुरु होऊन ११ जूनला संपणार आहे.
३५ वर्षीय फेडेररने या स्पर्धेत न खेळण्यामागे कारकिर्दीचा कालावधी वाढावा हे मुख्य कारण आहे.
फेडरर जुलै महिन्यापासून सुरु होणाऱ्या हार्ड ग्रास कोर्टच्या स्पर्धांना प्राधान्य देणार आहे. त्यात विंबल्डन ही मुख्य ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सनसनाटी विजय मिळवून त्याने मोसमाची जोरदार सुरुवात केली. यावर्षी खेळलेल्या ४ स्पर्धांत ३ विजेतेपद फेडररने जिंकली आहेत. त्यात त्याने त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी नदाल वर ३ विजय मिळविले आहे.
२००९ साली फ्रेंच ओपन जिंकून फेडररने करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते. आज फेडेरेरच्या खात्यात विक्रमी १८ ग्रँडस्लॅम पदके आहेत. माद्रिद ओपन पूर्वी फेडरर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी होता. या आठवड्यात नदालने माद्रिदमधील स्पर्धा जिंकून त्याला क्रमवारीत मागे टाकले. विंबल्डन तीन जुलैपासून सुरू होणार आहे.
गेल्या वर्षी प्रथमच दुखापतीमुळे फेडरर फ्रेंच ओपनमध्ये खेळू शकला नव्हता. टेनिसचा १९९९ मध्ये श्रीगणेशा केल्यापासून फेडरर दुसऱ्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये खेळत नाही. बाकी ग्रँडस्लॅम स्पर्धांपेक्षा ही स्पर्धा फेडररसाठी कायमच खडतर ठरलेली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये फेडररने सहभागी व्हायचा विश्वास प्रकट केला आहे.