येत्या २३ जुलैपासून ८ ऑगस्टपर्यंत टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र, या मोठ्या स्पर्धेतून स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने माघार घेतली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. टोकियो ऑलिंपिकसाठी फेडररचा स्वित्झर्लंडच्या खेळाडूंच्या पथकात समावेश होता. मात्र, दुखापतीमुळे त्याने माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
फेडररने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की ‘ग्रास कोर्टच्या हंगामादरम्यान मला दुर्दैवाने गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास झाला. त्यामुळे मला टोकियो ऑलिंपिकमधून माघार घेण्याचा निर्णय स्विकारावा लागला आहे. माझी खूप निराशा झाली आहे, कारण जेव्हाही मी स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे, तेव्हा माझ्यासाठी प्रत्येकवेळी तो सन्मान होता आणि माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचा भाग होता.’
फेडररने पुढे म्हटले की ‘मी पूर्वपदावर येण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आशा आहे की येत्या उन्हाळ्याच्या अखेरीस मी पुनरागमन करेल. मी संपूर्ण स्विस संघाला शुभेच्छा देतो आणि मी त्यांना दुरून पाठिंबा देत राहिल. नेहमीप्रमाणे, हॉप स्विस!’
— Roger Federer (@rogerfederer) July 13, 2021
फेडररच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया
२० ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररच्या गुडघ्यांवर गेल्यावर्षी दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे तो गेल्या वर्षभरापासून संघर्ष करत आहे. तो बरीच महिने या शस्त्रक्रियेमुळे टेनिसपासूनही दूर होता.
त्याला नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या हबर्ट हुरकाच याने पराभूत केले होते. तसेच त्यापूर्वी फेडररने मागील महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही तिसऱ्या फेरीतील विजयानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती.
पुढील महिन्यात ४० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या फेडररच्या निवृत्तीची चर्चा सध्या जोर धरत आहे. दरम्यान, याबद्दल त्याने विम्बल्डन २०२१ मधील उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर म्हटले होते की त्यालाच याबद्दल पुरेशी कल्पना नाही.
फेडररने २०१२ साली ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.
टोकियो ऑलिंपिकमधून या दिग्गज टेनिसपटूंची माघार
फेडररपूर्वी टोकियो ऑलिंपिकमधून अनेक दिग्गज टेनिसपटूंनी माघार घेतली आहे. टोकियो ऑलिंपिकमधून माघार घेणाऱ्या स्टार टेनिसपटूंच्या यादीत राफेल नदाल, डॉमनिक थीम, सेरेना विलिम्स, सिमोना हालेप, निक किरगियॉस, स्टॅन वावरिंका अशा अनेकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलदरम्यान आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने मुलीसोबत केली होती छेडछाड, कोर्टापर्यंत गेलते प्रकरण
कधीकाळी चौकार-षटकार ठोकणारी बार्टी बनली विम्बल्डन विजेती; आयसीसीने खास व्हिडिओसह केले अभिनंदन