भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हैदराबाद येथे खेळला गेला. रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवत मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. भारतीय संघ आगामी विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. त्याचवेळी भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनलाय. मात्र, आता स्वतः कर्णधार रोहित शर्माने त्याची पाठराखण केली आहे.
भुवनेश्वर कुमार हा मागील काही काळापासून डेथ ओव्हर्समध्ये सातत्याने महागडा ठरतोय. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या, श्रीलंकेविरुद्धच्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 19 वे षटक टाकले होते. या तिन्ही सामन्यात मिळून त्याला केवळ 19 व्या षटकात 49 धावा चोपल्या गेल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात 18 वे षटक टाकूनही 21 धावा गेल्याने त्याच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला भुवनेश्वर कुमारविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित म्हणाला,
“आपण त्याला वेळ द्यायला हवा. कारण, जेव्हा त्याच्यासारखा गोलंदाज तुमच्या संघात असतो, त्याच्याकडे ज्या प्रकारची क्षमता आहे त्यावरून त्याचे चांगले दिवस लगेच येतील. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तो मागील काही काळापासून खराब दिवसांमधून जातोय.”
रोहितने दुसरा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याचेदेखील समर्थन केले.
“हर्षल दुखापतीनंतर पुनरागमन करतोय. दोन महिन्यानंतर मैदानात उतरल्यावर लय सापडण्यासाठी थोडा वेळ जातो. त्याने याआधी अशी अवघड षटके टाकली आहेत. आम्हाला त्याच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. तो नक्कीच याला न्याय देईल.” असे रोहितने म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! तानिया भाटियाच्या हॉटेल रुममधून खासगी साहित्याची चोरी; लंडनमध्ये घडली घटना
विरोधी संघाला धावा गिफ्ट करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाची साथ सोडून हार्दिक पंड्या निघालाय नवीन दौऱ्यावर, पाहा फोटो