भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या ३६९ धावांच्या प्रत्युतरात २ बाद ६२ धावा केल्या आहेत. भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले असून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर आहेत.
मात्र या सामन्यात रोहित शर्मा ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावर तीकीचे झोड उठली होती. रोहित शर्मा बाद होण्यापूर्वी खेळपट्टीवर सेट झाला होता आणि अतिशय सहजपणे फलंदाजी करत होता. मात्र नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर उच्च फटका मारण्याच्या प्रयत्नात तो लॉंग ऑनवरील मिचेल स्टार्कच्या हाती झेल देऊन माघारी परतला. सेट झाला असतांना असा मोठा फटका खेळण्याची गरज नव्हती, असं म्हणत अनेकांनी त्याच्या या बाद होण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे.
मात्र आता खुद्द रोहितने त्यावर स्पष्टीकरण दिले. दिवसाचा खेळ संपल्यानंतरच्या आभासी पत्रकार परिषदेत तो बोलत होता. तो म्हणाला, “हा फटका मी नेहमीच खेळत असतो. यापूर्वीही अनेकदा मी उत्तमपणे हा फटका खेळून धावा वसूल केल्या आहेत. त्यामुळे मी स्वत:ला हा फटका खेळण्यासाठी कधीच रोखून ठेवत नाही. माझी संघातील भूमिकाही मला अशा प्रकारचे आक्रमक फटके खेळण्याची परवानगी देते.”
बाद होण्याची माझीही इच्छा नसते असं म्हणत तो पुढे म्हणाला, “सेट झाल्यावर मोठी खेळी उभारणे, हे माझेही लक्ष्य असते. मात्र माझ्या खेळण्याची एक पद्धत आहे. ज्यावेळी मी सेट झालेला असतो, त्यावेळी संपूर्ण खेळत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यांच्यावर सतत दबाव ठेवण्याची माझी रणनीती असते. आणि त्यामुळेच मी वेळोवेळी मोठे फटके खेळत असतो. कधीकधी हे फटके सीमारेषेपार जातात तर कधी कधी फिल्डरच्या हातात जातात. आजचं बाद होणंही त्याच प्रकारातील होतं. मलाही त्याचं दु:ख झालं. मात्र पुन्हा तेच सांगेन की आक्रमक फटके खेळणं हा माझ्या फलंदाजीचा स्थायीभाव आहे, आणि त्यामुळे मी ते फटके खेळत राहील.”
Rohit Sharma on his dismissal in the first innings at the Gabba Test.#AUSvIND pic.twitter.com/aIReacNKmP
— BCCI (@BCCI) January 16, 2021
दरम्यान, ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे दोन सत्रांचाच खेळ होऊ शकला. सकाळी ५ बाद २७४ धावांवर सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा डाव ३६९ धावांवर आटोपला. त्याच्या प्रत्युतरात भारताने २६ षटकांत २ गडी गमावून ६२ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शुबमन गिल बॅटवरचे स्टिकर सिडनीतच विसरला? पाहा नक्की काय आहे प्रकरण
काय सेटिंग आहे भिडू!! मोठ्या पहाडीच्या काठावर चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, एकदा व्हिडिओ बघाच
पंड्या बंधूंच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने विराट झाला भावूक, ट्विट करत व्यक्त केला शोक