बरोबर 10 वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये एक असं वादळ आलं होतं, जे यापूर्वी कोणीच पाहिलं नव्हतं. क्रिकेटच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडली होती. आजच्याच दिवशी 2014 मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात अशी खेळी खेळली होती, जी कोणताही क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही!
13 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि श्रीलंका यांच्यात चौथा एकदिवसीय सामना खेळला जात होता. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मानं 264 धावांची विक्रमी खेळी खेळली होती. ही अजूनही एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे!
रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत 152.60 च्या स्ट्राईक रेटनं 264 धावा केल्या. या खेळीत त्यानं 33 चौकार आणि 9 षटकार मारले. या स्फोटक फलंदाजीनं रोहितनं वीरेंद्र सेहवागचा 219 धावांचा विक्रम तर मोडलाच, मात्र 50 षटकांच्या सामन्यात सामान्यतः संघ जेवढ्या धावा करतो तितक्या धावा त्यानं एकट्यानंच केल्या! ही खेळी रोहितच्या फलंदाजीतील प्रतिभा आणि लढाऊ भावनेचं अप्रतिम प्रदर्शन होतं, ज्यामुळे त्याला क्रिकेटप्रेमींच्या हृदयात विशेष स्थान मिळालं.
भारताला सामन्याच्या सुरुवातीलाच धक्का बसला होता. मात्र रोहित शर्मानं विराट कोहलीच्या साथीनं डाव सांभाळला. दोघांनी भागिदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणलं. रोहितनं प्रथम 99 चेंडूत शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर आपला गियर बदलला. विराट कोहली 66 धावा करून बाद झाल्यानंतर रोहितनं धावांचा वेग वाढवत 151 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. तो येथेच थांबला नाही, तर 250 धावा करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणार पहिला फलंदाज बनला. रोहित 264 धावांच्या वैयक्तिक स्कोरवर बाद झाला.
रोहित शर्माच्या या खेळीच्या जोरावर भारतानं 50 षटकांत 5 गडी गमावून 404 धावा केल्या. प्रत्युत्तारात, भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत श्रीलंकेला 251 धावांत रोखलं आणि हा सामना 153 धावांनी जिंकला. या ऐतिहासिक कामगिरीसाठी अर्थातच रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा –
“तो चिडखोर स्वभावाचा…”, गौतम गंभीरच्या वक्तव्यावर रिकी पाँटिंगचा शाब्दिक हल्ला
“विराट-रोहितनं काही काळ क्रिकेटपासून दूर राहावं”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला
रोहित, विराट की धोनी, आयपीएल 2025 साठी तुमचा जोडीदार कोण? केएल राहुलचे मजेशीर उत्तर