---Advertisement---

रोहित शर्मा वाढदिवस स्पेशल: 6 ट्रॉफी, एका हॅट्ट्रीकसह 7 हजार धावा! हिटमॅनचे आयपीएलमधील काही विशेष रेकॉर्ड्स

On: गुरूवार, एप्रिल 30, 2026 10:53 AM
---Advertisement---

हिटमॅन अर्थातच रोहित शर्मा आज (गुरूवार, ३० एप्रिल) त्याचा ३९ वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दोन दशके उलटली आहेत. या २० वर्षात त्याने अनेक विक्रम केले. तो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळणारा चार खेळाडूंपैकी एक आहे.

रोहितने १९ आयपीएल हंगामामध्ये खेळताना अनेक विक्रम केले असून काही मोडलेही आहेत. त्याच्या नावावर असे की विक्रम आहेत, जे मोडणे जवळपास अशक्य आहेत. तो आयपीएलमध्ये ६ ट्रॉफी जिंकला आहे. यातील पाच ट्रॉफी त्याने एमआयने नेतृत्व (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०) करताना जिंकल्या, तर एक ट्रॉफी डेक्कन चार्जर्सकडून (२००९) खेळताना जिंकली आहे. त्यामुळे सहा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तो केवळ दुसराच खेळाडू आहे. रोहितनंतर केवळ अंबाती रायुडुने सहा आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

रोहित आयपीएलमध्ये ७००० पेक्षा अधिक धावा करणारा आणि हॅट्ट्रीक घेणारा एकमेव खेळाडू आहे. ही हॅट्ट्रीक त्याने २००९ मध्ये डेक्कनकडून खेळताना एमआय विरुद्ध घेतली होती. यामध्ये त्याने २ षटकात ६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने १६ व्या षटकात अभिषेक नायर आणि हरभजन सिंगला लागोपाठ बाद केले. त्यानंतर १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेपी ड्युमिनिची विकेट घेत आपली हॅट्ट्रीक पूर्ण केली.

त्याचबरोबर रोहित आयपीएलमध्ये २० पेक्षा अधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा एकमेव भारतीय आहे. त्याने आतापर्यंत २१ सामनावीर पुरस्कार जिंकले असून विराट कोहलीने २० जिंकले आहेत.

रोहितने त्याचा पहिला आयपीएल सामना २००८ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता शून्यावर बाद झाला होता. त्याने आतापर्यंत २७६ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ७१८३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १५ विकेट्सही घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---