टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यात भारताने अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने निर्धारित २० षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात २१० धावा केल्या होत्या. २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून १४४ धावाच करू शकला. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी सामन्यात अर्धशतके ठोकत शतकीय भागीदारी रचली. आपल्या शतकीय भागीदारीदरम्यान दोघांनी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी १४० धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी वैयक्तीक अर्धशतकं केली. टी२० विश्वचषक स्पर्धेत एकाच सामन्यात दोन्ही भारतीय सलामीवीरांनी अर्धशतक ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे.
याआधी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी २००७ सालच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यावेळी डर्बनला झालेल्या या सामन्यात सेहवागने ६८ धावांची आणि गंभीरने ५८ धावांची भागीदारी केली होती.
याशिवाय आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चार वेळा शतकीय भागीदारी रचली आहे.
सामन्यादरम्यान, अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक ७४ धावा केल्या. केएल राहुलने ६९ धावांचे योगदान दिले. रोहित आणि राहुल यांनी १४० धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी जोरदार फटकेबाजी करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६३ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतने १३ चेंडूत २७ आणि हार्दिक पांड्याने १३ चेंडूत ३५ धावा केल्या आणि दोघेही नाबाद परतले. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि करीम जनात यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
भारतीय संघाने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून १४४ धावाच करू शकला.
आता भारतीय संघ २ गुणांसह गट २ मध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचे ८ गुण आहेत, तर अफगाणिस्तान ४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसर्या क्रमांकावरील न्यूझीलंडचेही ४ गुण आहेत, पण नेट रनरेटच्या बाबतीत ते अफगाणिस्तानच्या मागे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित-राहुल जोडी नंबर एक! चौदा वर्षांपूर्वी सेहवाग-गंभीरचा विक्रम मोडत ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान
रोहितचा झंझावात! अफगाणिस्तानविरुद्ध ७४ धावांच्या खेळीसह जयवर्धनेच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
पंतने अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले ३ षटकार अन् धोनीला ‘या’ विक्रमात टाकले मागे