टी२० विश्वचषक २०२१ मध्ये सुपर १२ फेरीच्या ३३ व्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन संघ एकमेकांसमोर होते. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. भारताने या सामन्यत प्रथम फलंदाजी केली आणि अफगाणिस्तानसमोर मोठे आव्हान उभे केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलने डावाची चांगली सुरुवात केली आणि त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर संघाने मर्यादित २० षटकांमध्ये २०० धावांचा टप्पा पार केला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही या सामन्यात महत्वाचे योगदाने दिले. तसेच त्याच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
रिषभने या सामन्यात १३ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद २७ धावा केल्या. रिषभने त्याच्या या छोट्या खेळीमध्ये चौकार कमी आणि षटकार जास्त मारले. त्याने या धावा एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर केल्या. याचसोबत रिषभ टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
भारतीय संघासाठी टी२० विश्वचषकात एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांचा विचार केला, तर यामध्ये प्रामुख्याने दोनच नावे दिसतात. एक म्हणजे रिषभ पंत आणि दुसरे म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. पंतने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात तीन षटकार मारून या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.
यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात दोन षटकार मारले होते. तसेच धोनीने टी२० विश्वचषकाच्या इतिहासात तीन सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन षटकार मारले आहेत. धोनीने टी२० विश्वचषकात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज या तीन संघांविरुद्ध खेळताना प्रत्येकी दोन- दोन षटकार मारले आहेत. धोनी ६ टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळला आहे.
दरम्यान, सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाने तुफानी खेळी करून त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताने मर्यादित २० षटकांमध्ये दोन विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या आणि अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये सलामीवीर रोहित शर्माने ४७ चेंडूत ७४ आणि केएल राहुलने ७८ चेंडूत ६९ धावा केल्या. यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्यानेही (३५) संघाच्या धावसंख्येत महत्वाचे योगदान दिले.
अफगाणिस्तानला २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकांत ७ बाद १४४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ६६ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित-राहुल जोडीची कमाल! तब्बल १४० धावांची भागीदारीसह मोठा विक्रम केला नावावर
भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार सांगणाऱ्या ब्रेट लीने घेतला यू-टर्न, आता ‘या’ दोन संघांचे घेतले नाव
टी२० विश्वचषकात भारताला सुरुवातीलाच अपयश आल्याने विनोद कांबळीची धोनीच्या मार्गदर्शक पदावर टीका





