आज आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ५ व्या स्थानावर आला असून त्याला ४ स्थानांची बढती मिळाली आहे. रोहितच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील ७९० रेटिंग पॉईंट सर्वोत्तम आहेत परंतु क्रमवारीतील ३रे स्थान त्याच सर्वोत्तम आहे जे त्याने फेब्रुवारी २०१६ मध्ये मिळवलं होत.
रोहितने नुकत्याच झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. ५ सामन्यांच्या या मालिकेत त्याने एका शतकासह दोन अर्धशतके करत २९६ धावा केल्या आहेत.
तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर कायम आहे. तर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेही ४ स्थानाची बढती मिळवत २४ व्या स्थानावर आला आहे.
नुकत्याच झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया कडून चांगली कामगिरी केलेल्या ऍरॉन फिंचची क्रमवारी सुधारली आहे. फिंच ९ स्थानांची बढती घेऊन १७ व्या स्थानी आला आहे तर वॉर्नर विराटच्या जवळ आला आहे. मालिका सुरु व्हायच्या आधी तो विराटपेक्षा २६ गुणांनी मागे होता.आता त्याचे ८६५ गुण झाले आहेत. आणि विराटचे ८७७ गुण आहेत.
त्याच बरोबर केदार जाधवने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी मिळावली आहे. तो आता ३६ व्या स्थानावर आला आहे.
तर गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी मिळवत ७ व्या स्थानावर मजल मारली आहे. त्याचबरोबर युजवेंद्र चहल ७५ व्या स्थानावर तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादव ८० व्या स्थानावर आला आहे.
पहिल्या दहा मध्ये भारताचे आता दोन गोलंदाज आहेत जसप्रीत बुमराह ५ व्या स्थानी तर अक्षर पटेल ७ व्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकाचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीरने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला मागे टाकले आहे.
अष्टपैलूंच्या क्रमवारीत बांग्लादेशच्या शाकिब अल हसनने अव्वल स्थान कायम राखल आहे. तर बेन स्टोक्सने टॉप ५ मध्ये मजल मारली आहे.