आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारतीय संघाचा शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात नामिबिया संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने तुफानी अर्धशतक झळकावले. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा भारतीय संघात एकमेव खेळाडू आहे, ज्याला सर्वाधिक टी२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. याच अनुभवाचा फायदा घेत त्याने मोठा विक्रम करत विराट कोहली आणि युवराज सिंगचा विक्रम मोडून काढला.
नामिबिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना, रोहित शर्माने ३७ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ५६ धावांची खेळी केली. यासह टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याच्या नावे भारतीय संघासाठी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची नोंद झाली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ८४७ धावा केल्या आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानी विराट कोहली आहे. ज्याने ८४५ धावा केल्या आहे. तसेच तिसऱ्या स्थानी युवराज सिंग असून, त्याने टी२० विश्वचषक स्पर्धेत ५९३ धावा केल्या होत्या.
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
८४७ धावा* – रोहित शर्मा
८४५ धावा – विराट कोहली
५९३ धावा – युवराज सिंग
भारतीय संघाचा ९ गडी राखून शानदार विजय
भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नामिबिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेविड विसेने सर्वाधिक २६ तर स्टीफन बार्डने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर नामिबिया संघाला २० षटकाअखेर ८ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ५४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.