मंगळवार (दि. २३ सप्टेंबर) या दिवशी यूएईतील अबू धाबी शहरात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पाचवा सामना खेळला गेला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झालेल्या या सामन्यात मुंबईच्या रोहित शर्माने एक नवा विक्रम त्याच्या नावावर केला आहे.
रोहित आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा एकूण चौथा तर भारतीयांमध्ये दुसरा खेळाडू ठरला आहे. रोहितने आयपीएलमध्ये १९० सामन्यात बरोबर २०० षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
रोहितपुर्वी ख्रिस गेलने ३२६, एबी डिविलीयर्सने २१४ तर एमएस धोनीने २१२ षटकार मारले आहेत. एमएस धोनीनंतर २०० षटकारांचा टप्पा पार करणारा रोहित केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे. असे असले तरी आयपीएलमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा विक्रम मात्र ख्रिस गेलच्या नावावर कायम आहे.
२०० षटकारांचा टप्पा पार करण्यासाठी रोहितने सर्वाधिक सामने घेतले आहेत. ख्रिस गेलने १२५ सामन्यात ३२६, एबी डिविलियर्सने १५५ सामन्यात २१४ तर एमएस धोनीने १९२ सामन्यात २१२ षटकार मारले आहेत. रोहितनंतर पाचव्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज सुरेश रैना आहे. त्याने १९३ सामन्यात १९४ षटकार मारले आहेत. तो या हंगामात खेळत नाही. यामुळे सध्या षटकारांमध्ये रोहित, एबी व धोनीमध्ये मोठी स्पर्धा असणार आहे.