लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ओव्हल स्टेडियमवर गुरुवारपासून (२ सप्टेंबर) चौथा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (४ सप्टेंबर) भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
शनिवारी रोहित चांगल्या लयीत खेळताना दिसला. त्याने केएल राहुलसह ८३ धावांची सलामी भागीदारीही रचली. याचदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना ११ हजार धावा पूर्ण केल्या. हा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ चौथा सलामीवीर ठरला.
रोहितपूर्वी विरेंद्र सेहवाग (१६११९), सचिन तेंडुलकर (१५३३५) आणि सुनील गावसकर (१२२५८) यांनी सलामीला खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
मॅथ्यू हेडनला टाकले मागे
रोहितने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४६ वा डाव खेळत असताना ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ११ हजार धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनला मागे टाकले आहे. हेडनने २५१ डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने सलामीवीर म्हणून २४१ व्या डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावाही पूर्ण
रोहितने ओव्हल कसोटीदरम्यानच शुक्रवारी (३ सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पूर्ण केला होता. हा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ ८ वा खेळाडू ठरला. रोहितने या १५ हजार धावा त्याच्या कारकिर्दीतील ३९६ व्या आंतरराष्ट्रीय डावात फलंदाजी करताना केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५ हजार धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित आता ५ व्या क्रमाकंवार आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
देशवासियांची मान उंचावली! बॅडमिंटनमध्ये प्रमोदने जिंकले ‘सुवर्ण’, तर मनोजच्या नावावर ‘कांस्य’
बड्डेदिनी ‘या’ ३ भारतीय क्रिकेटपटूंना बसाव लागलं बाकावर; इशांत, शमीचाही समावेश