भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना इंदोर येथे खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात शानदार खेळ दाखवत 49 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यात 220 पेक्षा जास्त धावा भारतीय गोलंदाजांविरुद्ध चोपल्या. चालू वर्षी भारतीय गोलंदाजांची कामगिरी इतकी खराब झाली आहे की, मागील सात वर्षातील नकोशा विक्रमाची त्यांनी बरोबरी केलीये.
भारतीय संघाला 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, यावर्षी भारतीय संघाने डेथ ओवर्स मध्ये अक्षरशः लाजिरवाणी कामगिरी केली आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात 16 ते 20 षटकांदरम्यान भारतीय गोलंदाज 75 पेक्षा जास्त धावा लुटवत आहेत. मागील पंधरावड्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळून 6 टी20 सामने खेळले. त्यापैकी तीन सामन्यात विरोधी संघ 200 पेक्षा जास्त धावा काढण्यात यशस्वी ठरले. संपूर्ण वर्षभरात भारतीय गोलंदाजांनी टी20 क्रिकेटमध्ये 6 वेळा अशी नामुष्की आणली आहे.
आकड्यांचा विचार केला गेल्यास 2014 ते 2021 या कालावधीत भारतीय संघाने केवळ 6 सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या. मात्र, 2022 मध्येच आतापर्यंत सहा वेळा या धावा बहाल केल्या आहेत.
भारतीय संघासाठी या वर्षभरात भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, दीपक चहर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, आवेश खान, अक्षर पटेल व युझवेंद्र चहल यांनी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आहे. मात्र, यापैकी कोणीच धावा रोखण्यात यशस्वी ठरले नाही. आगामी विश्वचषकातून बुमराह बाहेर गेल्याने भारतीय संघासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी