मुंबई । येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. टी 20 मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर कसोटी आणि वनडे मालिका खेळविली जाईल. हा दौरा भारतीय संघासाठी अग्निपरीक्षा असणार आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
रोहित शर्मा वनडे सोबत कसोटी सामन्यातही सलामीला खेळणार आहे. तो पहिल्यांदाच विदेशी दौऱ्यात कसोटीमध्ये सलामीला खेळणार असल्याचे बोलले जात आहे. त्याने यापूर्वी ही कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मायकल हसीने ‘हिटमॅन’ ऑस्ट्रेलियामध्ये सुपरहिट ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मागील वर्षी मायदेशात देशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात रोहित सलामीला खेळत दमदार कामगिरी केली होती. न्यूझीलंड दौऱ्यात स्नायू दुखावल्यामुळे तो दोन कसोटी सामने खेळू शकला नाही.
“जगातील कोणत्याही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीत क्रिकेट खेळणे एक परीक्षाच आहे. परंतु वनडेप्रमाणे कसोटीमध्ये देखील रोहितला चांगली लय सापडेल. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे,”असे मायकल हसी म्हणाला.
हसीच्या मते, “स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन भारतासाठी अडचणीचे ठरणार आहे. 2018 साली भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदी घालण्यात आल्याने ही मालिका खेळू शकले नव्हते. स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्या पुनरागमनाने संघ मजबूत झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा संघ खूपच अनुभवी झाला आहे. अति उष्ण तापमानात भारतास ऑस्ट्रेलिया चांगली टक्कर देऊ शकेल.”
इंग्लंडचे माजी कर्णधार माईक अॅथरटन यांनी देखील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रोहित शर्मा चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. माइक अॅथरटन म्हणाले, “ऑस्ट्रेलियाच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर रोहित शर्मा खूप चांगल्या धावा करू शकेल.”
2018 साली भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा 2-1 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती.