सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर असून सध्या भारतीय संघासाठी विजय अशक्य दिसतोय. इथून या सामन्याचे दोनच निकाल शक्य वाटतात, एकतर ऑस्ट्रेलियाचा विजय किंवा ड्रॉ.
टीम इंडियानं मालिकेचा पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला होता. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर टीम इंडिया आणखी मजबूत होईल असं वाटत होतं, परंतु सध्या तरी तसं काही दिसत नाहीये. दरम्यान, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बसित अली यांनी भारतीय संघाबाबत एक मोठं वक्तव्य केलंय.
बसित अली यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक नाही. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, असं त्याचं मत आहे. बसित अली यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, “रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांचं एकमत दिसत नाही, मग ती श्रीलंका, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका असो, जी कमकुवत संघांविरुद्ध होती किंवा त्यानंतर न्यूझीलंड मालिका असो. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत दिसायचं, ते गंभीर आणि रोहितमध्ये दिसत नाही.
बसित अली यांनी टीम इंडियाच्या बॉलिंग कॉम्बिनेशनवर देखील आपलं मतं मांडलं. ते म्हणाले, “तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघानं तीन वेगवेगळे फिरकीपटू खेळवले. दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण या कसोटीत त्यांनी गोलंदाजी निवडली. ऑस्ट्रेलियन संघात तीन डावखुरे फलंदाज आहेत. मग संघात वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन का नाही?”
बसित अली यांनी गाबा येथे भारताच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. टीम इंडियाला एका डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव भासत असल्याचं बसित अली यांना वाटतं. ते पुढे म्हणाले, “प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता असं मला वाटत नाही. भारतीय संघ फक्त बुमराहवर अवलंबून आहे. बाकीचे गोलंदाज हवं तसं प्रदर्शन करत नाहीत. मी बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलिया असं म्हटलं तर ते योग्य होईल. रोहित किंवा (गोलंदाजी प्रशिक्षक) मॉर्नी मॉर्केल आणि (मुख्य प्रशिक्षक) गौतम गंभीर यापैकी कोणीही ही समस्या सोडवू शकलं नाही.”
हेही वाचा –
2 दिवसांचा खेळ बाकी अन् 16 विकेट्स हातात! टीम इंडिया गाबा कसोटी वाचवू शकते का?
गाबा टेस्ट पावसामुळे रद्द झाली तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? ताजं समीकरण जाणून घ्या
ये रे माझ्या मागल्या! ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाज सतत फ्लॉप का होत आहेत?