मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार (मर्यादीत षटकांचा) रोहित शर्माने सुर्याकुमार यादवबद्दल मोठे विधान केले आहे. आज (१४ सप्टेंबर)आपला ३०वा वाढदिवस साजरा करत असलेला सुर्याकुमार यादव लवकरच भारतीय संघाकडून खेळताना दिसेल, असे वक्तव्य रोहितने केले आहे.
सध्या रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे. स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यात आज मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू असलेल्या सुर्याकुमार यादव व माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा वाढदिवस हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी शुभेच्छा देतना रोहितने सुर्याकुमारचे भरभरून कौतूक केले. “तू भारतीय संघात लवकरच जागा मिळवणार आहेस. मला माहित आहे की येणारा क्रिकेट हंगाम तुझ्यासाठी खास असणार आहे. तू गेले दोन हंगाम जबरदस्त खेळ केला आहेस व सध्याही चांगल्या फॉर्ममध्ये आहेस. याचमुळे भारतीय संघात येण्यापासून तुला कुणीही रोखू शकत नाही, ” असे यावेळी रोहित म्हणाला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला रोहित हा कायमच संघसहकाऱ्यांचं मनोबल वाढविण्यासाठी ओळखला जातो. तो भारतीय संघाकडून खेळत असो अथवा मुंबईकडून तो कायमच एक प्रेरणादायी खेळाडू व कर्णधार राहिला आहे. याचमुळे रोहितच्या बोलण्याला एक वेगळेच महत्त्व आले आहे.
यावेळी मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत. त्यात हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, ईशान किशन, सुर्याकुमार यादवसह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. जेव्हा सुर्याकुमारचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तेव्हा त्याला याच संघसहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच माजी प्रशिक्षक राहिलेल्या रॉबिन सिंग यांचाही वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
गेल्या दोन हंगामापासून सुर्याकुमार मुंबई इंडियन्सकडून खेळत असून चांगली कामगिरी करत आहे. २०१८ हंगामात त्याने १३३.३३च्या स्ट्राईक रेटने ५१२ धावा केल्या होत्या तर २०१९ हंगामात त्याने ४२४ धावा केल्या होत्या. यावेळीही त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे.