त्रिनिदाद येथे वेस्ट इंडीज व भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत करत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा याने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्यावेळी त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
भारतीय संघाला पहिल्या डावात 183 धावांची आघाडी मिळाली. ही आघाडी घेऊन दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी पुन्हा एकदा दमदार सलामी दिली. रोहित शर्माने केवळ 35 चेंडूंमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील सोळावे अर्धशतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. बाद होण्यापूर्वी त्याने 44 चेंडूंवर 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 57 धावांची आक्रमक खेळी केली.
या खेळीत सहावी धाव काढताना त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील आपल्या 2000 धावांचा टप्पा पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर व श्रीलंकेचा दिमुथ करूणारत्ने यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा सलामीवीर आहे. रोहितने आपली हीच खेळी पुढे नेताना या दोघांना पछाडत सलामीवीर म्हणून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर होण्याचा मान देखील मिळवला.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे हे तिसरे चक्र आहे. या तिन्ही चक्रात मिळून रोहितच्या नावे आता 2051 धावा जमा झाल्या आहेत. तर, वॉर्नर 2040 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, करुणारत्नेच्या नावे 2020 धावा आहेत. पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात करूणारत्ने याच्याकडे पुन्हा एकदा या आकडेवारीत अव्वलस्थानी जाण्याची संधी असेल.
(Rohit Sharma Hits Most Runs As Opener In WTC)
आणखी वाचा:
एशिया कप फायनलमध्ये यंग इंडियावर अन्याय? पंचांनी केल्या दोन अक्षम्य चुका
त्रिनिदाद कसोटीवर भारतीय संघाची मजबूत पकड! चौथा दिवस रोहित-किशनच्या नावे