भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात तो संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान संघात सामील होईल. तो 24 नोव्हेंबरला पर्थमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. रोहित पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघासोबत दिसू शकतो.
रोहित शर्मा पत्नीच्या बाळांतपणामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात सहभागी होणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्यानं घरीच राहण्याचा निर्णय घेतला होता. तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नव्हता. रोहितसोबतच शुबमन गिलही पर्थ कसोटीतून बाहेर पडला आहे. WACA येथे सुरू असलेल्या आंतर-संघ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिल स्लिपमध्ये झेल घेण्याचा प्रयत्नात जखमी झाला होता.
रोहितनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीला पहिल्या कसोटीला मुकावं लागण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र त्यानं मुलाच्या जन्मानुसार शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा पर्यायही ठेवला होता. शुक्रवारी रोहितची पत्नी रितिका हिनं मुलाला जन्म दिला.
‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, रोहित शर्मानं बीसीसीआयच्या संबंधित अधिकाऱ्यांना रविवारी संघात सामील होणार असल्याचं कळवलं आहे. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळेल. तो 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीनंतर दुसऱ्यांदा कर्णधार बनला आहे. दुसऱ्या कसोटीत रोहित पुन्हा एकदा टीम इंडियाची कमान सांभाळेल. दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार असून तो दिवस-रात्र सामना आहे.
हेही वाचा –
लिस्ट जाहीर! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये हे दिग्गज कॉमेंट्री करताना दिसतील
भारतीय संघाला मोहम्मद शमीची आवश्यकता नाही? दिग्गज खेळाडूने सांगितली रिप्लेसमेंट
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली! कर्णधारानं दिलं मोठं अपडेट